जगभरात अत्यंत नावाजलेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ जगभरातील काही विशिष्ट मोजके चित्रपट निवडणाऱ्या ‘अन सर्टन रिगार्ड’ या विभागात ‘द शेमलेस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन कॉन्स्टँटिन बोजानोव्ह यांनी केलंय. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा एक लक्षवेधी चित्रपट असून त्यातील मानवी मूलभावनांचं रेखाटन आणि खिळवून ठेवणाऱ्या कथानकासाठी गौरविण्यात आला आहे. ‘द शेमलेस’ ही नादिरा नावाच्या मुलीची एक चित्तथरारक कथा आहे, जी आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस अधीक्षकांशी लढून दिल्लीतील एका वेश्यालयातून स्वतःची सुटका करून पळून जाते.
वेश्यालयातून पळून जाऊन आता रेणुका ही नवीन ओळख घेऊन ती सेक्स वर्कर्सच्या एका समुदायात आश्रय घेते. त्यादरम्यान तिचं देविकाशी अपेक्षित नसलेले बंध प्रस्थापित होतात. देविका ही देवदासी प्रथेनुसार वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकलेली एक तरुण मुलगी आहे. इथून त्या दोघी एकमेकांच्या साथीने अत्याचाराच्या तावडीतून सुटण्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एका जीवघेण्या प्रवासाला सुरुवात करतात.
या चित्रपटात रोहित कोकाटे या मराठमोळ्या अभिनेत्याने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा रोहित कोकाटे याने ‘कौल’, ‘बळी’, ‘जाऊ कहा बता ए दिल’ या चित्रपटातील आणि ‘डेट विथ सई’, शी (सिझन टू), ‘बंबई मेरी जान’ या वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. तसंच ते इतर अनेक हिंदी, मराठी, तामिळ भाषिक चित्रपटांसाठी प्रेक्षकांना परिचित आहे. वास्तववादी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित कोकाटेने या चित्रपटात दिनेश या निर्दयी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. जो आपल्या स्वार्थासाठी या मुलींच्या हतबल परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण करतो.
या चित्रपटात ओमारा, अनसूया सेनगुप्ता, ऑरोशिखा डे, तन्मय धनानिया, किरण बी आणि मिता वशिष्ठ या दर्जेदार कलाकारांचा देखील समावेश आहे. कान्स चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक थियरी फ्रेमॉक्स यांनी जागतिक चित्रपटसृष्टीत भारताच्या वाढत्या सहभागाचा पुरावा म्हणून ‘द शेमलेस’ या चित्रपटाला अधोरेखित केलं आहे. महोत्सवाच्या विविध विभागातील निवडीमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांनी अन्य आशियाई चित्रपटांबरोबरच ‘द शेमलेस’ या चित्रपटाचं विशेष कौतुक केलं.
प्रेम, स्वातंत्र्य आणि मानवी दृढतेच्या विषयांना हात घालत रूढी परंपरेने तयार झालेले सामाजिक नियम आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर ‘द शेमलेस’ आपल्या हृदयस्पर्शी कथानकातून प्रश्न उभे करतो. ‘कान्स चित्रपट महोत्सव 2024’ साठी जगभरात उत्सुकता वाढत असतानाच, जगभरातील प्रेक्षकांना भारतीय कथाकथनाची समृद्ध मेजवानी सादर करणारा ‘द शेमलेस’ हा चित्रपट सिनेमातील उत्कृष्टतेची एक दर्जेदार कलाकृती म्हणून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.