मुंबई : लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘पाणी पाणी’ हा बहुचर्चित कथासंग्रह आता (3 ऑगस्ट 2021) स्टोरीटेलवर विनय आपटे, लालन सारंग आणि डॉ. गिरीश ओक या दिग्गज कलाकारांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांच्या भारदस्त आवाजातली कलाकृती ऐकण्याची संधी यानिमित्तने त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी रंगमंचावर अनेक नाटकं गाजवली. आजच्या मिलेनियल पिढीला त्यांचा अभिनय प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्याचं भाग्य लाभलं नसलं तरी या ऑडियोबुकच्या माध्यमातून नव्या जुन्या पिढीच्या रसिकांना पुन्हा एकदा त्यांच्या आवाजाची जादू अनुभवता येईल.
‘पाणी पाणी’ या लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथासंग्रहातल्या 14 कथा पाण्याचं दुर्भिक्ष्य, त्यातलं राजकारण, समाजकारण, समन्यायी पाणी वाटपाचं बासनात गुंडाळून ठेवलेलं धोरण, पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा स्त्रियांच्या आयुष्यावर होणारा परिणाम, पाणीचोरी, भ्रष्टाचार यांसारख्या अनेक मुद्द्यांवर बेतलेल्या असून या कथा अतिशय र्हदयस्पर्शी आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या देशमुखांच्या कथांची धाटणी वेगळी आहे, श्रोत्यांना खिळवून टाकण्याऱ्या या कथा आहेत.
आज एकीकडे महापुरांनी शहरं वेढली जात असताना दुसऱ्या बाजूला आटपाडी, कवठे महांकाळसारखी पश्चिम महाराष्ट्रातली गावं, मराठवाड्यातली, विदर्भातली शेकडो खेडी पिण्याच्या पाण्यासाठीही तहानलेली आहेत. जागतिक तापमानवाढीचं मोठं संकट संपूर्ण जगासमोर आ वासून उभं राहिलेलं असताना एकीकडे पूर आणि दुसरीकडे पाण्याचं दुर्भिक्ष्य असं विरोधाभासी चित्र दिसत आहे. या चित्राच्या सामान्य माणसाला न कळलेल्याही अनेक बाजू आहेत. हे अनेकविविध पैलू देशमुख यांच्या कथांमधून समजतात.
लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासारख्या समर्थ लेखकानं कथात्म साहित्याला आपल्या कारकिर्दीतील प्रशासकीय अनुभवाची, ज्ञानाची जोड दिल्यानं या कथा निव्वळ प्रश्नांच्या चर्चेपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यापलीकडे जात पाणीप्रश्नाची समज व्यापक करण्यासाठी मदत करतात पर्यावरण, पाणीप्रश्न हा अखिल मानवजातीसमोर उभा असलेला मोठा प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांपासून, समाजशास्त्राचे अभ्यासक, पर्यावरण कार्यकर्ते, राजकारणी, धोरणकर्ते, सामान्य नागरिक ते कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यापर्यंत प्रत्येकानंच ऐकाव्यात अशा या कथा आहेत. उत्तम साहित्यमूल्य आणि समाजशास्त्रीय संदर्भमूल्य असलेल्या या ‘तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा’ आता एकत्रितपणे दिग्गज कलाकारांच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐकता येतील.
रितेश देशमुखनं बायकोचं खरं नाव सांगितलं, पण ‘जिनिलिया’चा अर्थ काय?