प्रसिद्ध अभिनेता राहत्या घरी आढळला मृतावस्थेत; दोन दिवस संपर्क न झाल्याने मित्राला आला संशय

| Updated on: Jun 14, 2024 | 10:59 AM

प्रसिद्ध तमिळ अभिनेता प्रदीप के. विजयन हा चेन्नईमधील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. दोन दिवसांपासून मित्र फोन करत होता, मात्र प्रदीप फोन न उचलल्याने त्याला संशय आला. अखेर घरी भेटायला गेला असता प्रदीप मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

प्रसिद्ध अभिनेता राहत्या घरी आढळला मृतावस्थेत; दोन दिवस संपर्क न झाल्याने मित्राला आला संशय
actor Pradeep K Vijayan
Image Credit source: Instagram
Follow us on

‘थेगिडी’, ‘हे सिनामिका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कॉमेडी आणि खलनायकी भूमिका साकारणारा तमिळ अभिनेता प्रदीप के. विजयन बुधवारी त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. दोन दिवस कोणताच संपर्क न झाल्याने प्रदीपचा एक मित्र त्याच्या घरी त्याला भेटायला गेला, तेव्हा त्याला प्रदीप मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून प्रदीपच्या मृत्यूचं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रदीपच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रदीप अविवाहित होता आणि चेन्नईमधील पलवक्कम परिसरातील संकरपुरम फर्स्ट स्ट्रीट याठिकाणी एकटाच राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला श्वास घेण्यास त्रास आणि चक्कर आल्यासारखं जाणवत होतं. प्रदीपचा मित्र त्याला दोन दिवसांपासून फोन करत होता. मात्र अनेकदा फोन करूनही न उचलल्याने मित्र त्याच्या घरी गेला.

प्रदीपच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याच्या मित्राने वारंवार दार ठोठावून पाहिलं, मात्र आतून काहीच उत्तर मिळालं नाही. अखरे त्याने पोलिसांनी याविषयीची खबर दिली. त्यावेळी निलंकराई पोलीस हे अग्निशमन दलासह प्रदीपच्या घराजवळ पोहोचले आणि त्यांनी त्याच्या घराचं दार तोडलं. दार तोडून पाहिल्यास घरात प्रदीप मृतावस्थेत आढळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याच्या मृतदेहाला रोयापेट्टा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेलं आहे.

हे सुद्धा वाचा

डोक्यावरील मार आणि हृदयविकाराचा झटका यांमुळे प्रदीपचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नीलंकराई पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. प्रदीपच्या मृत्यूची बातमी समजताच चाहत्यांनी शोक व्यक्त केला. गायिका आणि अभिनेत्री सौंदर्या बाला नंदकुमारने लिहिलं, ‘हे धक्कादायक आहे. मी त्याला भावासारखं मानायचो. आम्ही दररोज संपर्कात नव्हतो पण जेव्हा कधी बोलणं व्हायचं तेव्हा आमच्यात खूप प्रेमळ संवाद व्हायचा. तुझी खूप आठवण येईल प्रदीप, तुझ्या आत्म्याला शांती लाभो.’

प्रदीप नायर पप्पू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीपने 2013 मध्ये ‘सोन्ना पुरियातू’ या चित्रपटाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘थेगिडी’ या चित्रपटात पूर्नाचंद्रनची भूमिका साकारल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत होता. मात्र त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 2023 मध्ये ‘रुद्रन’ या चित्रपटात तो अखेरचा झळकला होता. प्रदीप हा टेक ग्रॅज्युएट होता, मात्र अभिनयावरील प्रेमामुळे त्याने कॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.