2024 या वर्षातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे. या यादीत अभिनेता शाहरुख खान अग्रस्थानी असून त्याने यंदा 92 कोटी रुपये टॅक्स भरलंय. तर दुसऱ्या स्थानी साऊथ सुपरस्टार थलपती विजय आहे. सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत एका प्रसिद्ध कॉमेडियनचाही समावेश आहे. या कॉमेडियनने आमिर खान आणि कतरिना कैफ यांनाही मागे टाकलंय. एकेकाळी हा कॉमेडियन नैराश्यात होता आणि त्याने आत्महत्येचाही विचार केला होता. मात्र त्यानंतर त्याने स्वत:मध्ये बरेच बदल केले आणि आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर परतला आहे. हा कॉमेडियन दुसरा तिसरा कोणी नसून कपिल शर्मा आहे. ‘फॉर्च्युन इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार कपिल शर्माने 2024 मध्ये 26 कोटी रुपये टॅक्स भरला आहे.
शाहरुख खान- 92 कोटी रुपये
थलपती विजय- 80 कोटी रुपये
सलमान खान- 75 कोटी रुपये
अमिताभ बच्चन- 71 कोटी रुपये
2013 मध्ये कपिल शर्माने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो सुरू केला होता. या शोला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या शोचं नाव ‘द कपिल शर्मा शो’ असं ठेवलं गेलं. या शोमुळे कपिल टेलिव्हिजनवरील सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत सेलिब्रिटी बनला. त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलंय. 2017 मध्ये कपिलचा सहकलाकार सुनील ग्रोवरसोबत मोठा वाद झाला होता. त्यानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला होता. त्याच वर्षी त्याचा ‘किस किस को प्यार करूँ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. एकानंतर एक आलेल्या या संकटांमुळे कपिल नैराश्यात गेला होता.
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला होता, “सेलिब्रिटी असल्याने कोट्यवधी लोक तुम्हाला ओळखतात. तुम्ही त्यांचं मनोरंजन करता. पण जेव्हा तुम्ही घरी येता, तुम्ही एकटेच असता. तुम्ही इतरांप्रमाणे सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाही. तुम्ही टू-रुम फ्लॅटमध्ये राहता आणि जेव्हा संध्याकाळी बाहेर अंधार पडतो, तेव्हा जो एकटेपणा जाणवतो, त्याचं वर्णन मी शब्दांतसुद्धा करू शकत नाही. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचेही विचार होते. माझ्या मनातील भावना मी कोणालाच सांगू शकत नव्हतो.”