मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. बिग बॉसचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचं सूत्रसंचालनदेखील सलमान खानच करणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येक एपिसोडसाठी चांगलं मानधन मिळतं. मात्र आतापर्यंतच्या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकाला सर्वाधिक मानधन मिळालं, हे तुम्हाला माहित आहे का? या स्पर्धकाने फक्त तीन दिवसांसाठी तब्बल दोन कोटी रुपये स्वीकारले होते. विशेष म्हणजे हिना खान, सिद्धार्थ शुक्ला किंवा तेजस्वी प्रकाश या लोकप्रिय स्पर्धकांपैकी कोणीच नाही.
बिग बॉसच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणारी ही स्पर्धक चौथ्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात ती फक्त तीन दिवस राहिली होती. या स्पर्धकाचं नाव पामेला अँडरसन आहे. पामेला ही कॅनेडियन-अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. प्लेबॉय मासिकेतील मॉडेलिंगसाठी ती विशेष ओळखली जाते. याशिवाय ‘बेवॉच’ या टेलिव्हिजन सीरिजमध्ये तिने सी. जे. पार्करची भूमिका साकारली होती.
2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पामेलाने तिच्याविषयी धक्कादायक खुलासा केला होता. वयाच्या 6 ते 10 वर्षांपर्यंत महिला बेबीसीटरने माझा विनयभंग केला होता आणि 12 वर्षांची असताना एका 25 वर्षीय पुरुषाने बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. इतकंच नव्हे तर ती 14 वर्षांची असताना तिचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या सहा मित्रांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता, असाही धक्कादायक खुलासा पामेलाने केला होता.
पामेला बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ती बिग बॉसच्या घरात तीन दिवस राहिली. या तीन दिवसांसाठी तिला दोन कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं. सलमानने या सिझनचं पहिल्यांदा सूत्रसंचालन केलं होतं.
क्रिकेटर श्रीसांथला दर आठवड्याला 50 लाख रुपये मानधन मिळत होते. बिग बॉसच्या बाराव्या सिझनमध्ये तो सहभागी झाला होता. तर ‘बिग बॉस 4’मध्ये आलेल्या पहलवान खली यालासुद्धा दर आठवड्यासाठी 50 लाख रुपये मिळाले होते. बिग बॉस 12 मध्ये सहभागी झालेला अभिनेता करणवीर बोहरा याला दर आठवड्याला 20 लाख रुपये मिळत होते. तर बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाशला 17 आठवड्यांसाठी 1.7 कोटी रुपये मानधन मिळालं होतं. बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाला दर आठवड्यासाठी 9 लाख रुपये मिळत होते. तर बिग बॉस 12 ची विजेती दीपिका कक्करला दर आठवड्यासाठी 15 लाख रुपये मिळत होते.