सोशल मीडियावर सध्या ट्रोलिंगचं प्रमाण प्रचंड वाढलंय. सेलिब्रिटींच्या बाबतीत हे वारंवार घडताना दिसतं. याविरोधात काही सेलिब्रिटी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. तर काहीजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय निवडतात. अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. मग ते तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट केल्यामुळे असो किंवा मग तिच्या चालण्याच्या स्टाइलमुळे असो.. मलायका सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या टीकेचा सामना ती कशा पद्धतीने करते, याचं उत्तर तिने या मुलाखतीत दिलं आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या या मुलाखतीत मलायका म्हणाली, “प्रत्येकजण खूप मेहनत करतो आणि स्वत:चा ब्रँड बनवण्यासाठी बरेच कष्ट घेतो. इथे कोणीच शॉर्टकटचा पर्याय शोधत नाही. पण जर का तुम्ही माझ्या प्रवासाकडे पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की मी टीकांमधूनच माझं करिअर बनवलं आहे. माझ्या आवडीनिवडींबद्दल, मी जशी आहे त्याबद्दल, माझ्या कपड्यांबद्दल, किंबहुना माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला ट्रोल केलं जातं. त्यामुळे हा माझ्या संपूर्ण करिअरचा एक भाग बनला आहे. आता मला या गोष्टींची सवय झाली आहे.”
या मुलाखतीत मलायकाने तिच्या सोशल मीडिया पोस्टवरील सर्व नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं. ती पुढे म्हणाली, “मी ट्रोलर्सना त्यादिवशी उत्तर देईन जेव्हा मला त्यांना बोलणं गरजेचं वाटेल. जर एखादी व्यक्ती माझ्या जवळच्या व्यक्तीवर, माझ्यासाठी खास असणाऱ्या व्यक्तींवर निशाणा साधत असेल, तर नक्कीच मला त्याबद्दल बोललं पाहिजे. मात्र तोपर्यंत या सगळ्यात मी माझा वेळ, ऊर्जा, विवेक, श्वास वाया घालवणार नाही. त्यातून काहीच साध्य होणार नाही. माझ्या आयुष्यात काळजी करण्यासारख्या इतर बऱ्याच गोष्टी आहेत. मला कोणालाही कोणत्याच गोष्टीसाठी उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मग ते माझ्या खासगी आयुष्याबद्दल असो किंवा प्रोफेशनल गोष्टींबद्दल… मी कोणालाच स्पष्टीकरण देण्यासाठी बांधिल नाही.”
ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत असतानाच मलायकाने हेसुद्धा स्पष्ट केलं की त्यांनी तिच्या गप्प राहण्याचा गैरफायदा घेऊ नये. “मला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत गप्प राहायला आवडतं, कारण तो पर्याय मी स्वत: निवडते. मला ती अधिकची चर्चा नको असते, किंवा आवडत नाही. पण त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये”, असं ती पुढे म्हणाली.