अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिचा पती मोहसिन अख्तर मीर यांनी लग्नाच्या आठ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. उर्मिला आणि मोहसिन यांनी 2016 मध्ये घरातच अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. यामागचं कारण म्हणजे उर्मिला आणि मोहसिन यांचं आंतरधर्मीय लग्न. मोहसिन हा काश्मिरी मुस्लीम आणि उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे. त्यामुळे या दोघांच्या जोडीने अनेकांचं लक्ष वेधलं होतं.
मोहसिन हा काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल आहे. त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय. वयाच्या 21 व्या वर्षी तो मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला आला होता. 2007 मध्ये पार पडलेल्या ‘मिस्टर इंडिया’ या स्पर्धेत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. अभिनेत्री प्रिती झिंटासोबत त्याला करिअरमधली पहिली जाहिरात मिळाली होती. तर 2009 मध्ये त्याने ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ या चित्रपटातून त्याने अभिनयात पदार्पण केलं. त्याने फरहान अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातही काम केलं होतं. बॉलिवूडमध्ये जरी मोहसिनला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी काश्मिरी इम्ब्रॉयड्री व्यवसायात त्याने चांगलाच जम बसवला आहे. यासाठी तो मनिष मल्होत्रासोबत मिळून काम करतो.
उर्मिलासोबतच्या लग्नानंतर मोहसिनला सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याविषयी बोलताना उर्मिला एका मुलाखतीत म्हणाली होती, “त्याला दहशतवादी, पाकिस्तानी असं म्हटलं गेलं. माझा पती कोणताही मुस्लीम नाही तर काश्मिरी मुस्लीम आहे. आम्ही दोघं आमच्या पद्धतीने आपापल्या धर्माचं पालन करतो. मात्र हीच गोष्ट त्यांना ट्रोलिंगसाठी मोठा विषय देऊन गेली. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. त्यांनी माझा विकिपीडियाचा पेजसुद्धा बदलला होता. हे सर्व माझ्या विश्वासापलीकडचं होतं.”
उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर जून 2023 मध्ये पतीसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट केला आहे. ईदनिमित्त तिने ही पोस्ट शेअर केली होती. गेल्या वर्षभरापासून दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे कोणतेच फोटो पोस्ट किंवा शेअर केले नाहीत.