मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. राजस्थानमधील उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. ‘द लीला पॅलेस’मध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला परिणीतीची खास मैत्रीण आणि टेनीसपटू सानिया मिर्झासुद्धा उपस्थित होती. लग्नानंतर उदयपूर एअरपोर्टवर सानियाला पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. तुझ्या खास मैत्रिणीला लग्नाच्या दिवशी काय भेट दिलीस, असा प्रश्न पापाराझींनी तिला विचारलं.
पापाराझींच्या या प्रश्नावर सानियाने उत्तर दिलं, “आशीर्वाद दिला.” याआधी सानियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर परिणीतीच्या लग्नातील स्वत:चे काही फोटो पोस्ट केले होते. लग्नाच्या थीमनुसार सानियाने पांढऱ्या रंगाचा भरजरी लेहंगा परिधान केला होता. सानिया, परिणीती आणि फराह खान या तिघींची फार जुनी मैत्री आहे. परिणीती सानियाच्या मुलाला भेटण्यासाठीही गेली होती. या तिघींना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’ तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.