मुंबई- थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास महिना उलटला तरी ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ची (Kantara) जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरील बरेच विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. एवढी कमाई करणारा हा तिसरा कन्नड चित्रपट (Kannada Movie) आहे. कांतारा या कन्नड चित्रपटाला कर्नाटकमध्ये जोरदार प्रतिसाद मिळतोच आहे. पण त्याशिवाय देशातील इतर भागांमध्येही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.
ऋषभ शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. केजीएफ-चाप्टर 1 आणि चाप्टर 2 या दोन्ही चित्रपटांना ‘कांतारा’ने चांगली टक्कर दिली आहे. हिंदी आणि तेलुगू व्हर्जनलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
24 ऑक्टोबरपर्यंत कांताराने जगभरात 211 कोटींचा गल्ला जमवला. यात भारतातून चित्रपटाची 196.95 कोटी रुपयांची कमाई झाली. तर या चित्रपटांच्या हिंदी डबिंग व्हर्जनने 24 कोटी रुपये आणि तेलुगू व्हर्जनने 23 कोटी रुपये कमावले. प्रदर्शनानंतर फक्त दहा दिवसांत या चित्रपटाची एवढी कमाई झाली.
बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांच्या यादीत ‘कांतारा’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानी केजीएफ- चाप्टर 2 (1207 कोटी रुपये) आणि दुसऱ्या स्थानी केजीएफ- चाप्टर 1 (250 कोटी रुपये) आहे. बॉक्स ऑफिसवर कांताराची कमाई अद्याप सुरूच आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे.
23 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 दिवस झाले. या दिवशी कांताराने देशभरात 8 कोटी रुपयांची कमाई केली. कांताराने सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत मात्र केजीएफला मागे टाकलं आहे. 24 ऑक्टोबर रोजी कांताराचे कर्नाटकमध्ये 77 लाख तिकिटं विकली गेली. तर केजीएफ 2 ची 75 लाख आणि केजीएफ 1 ची 72 लाख तिकिटं विकली गेली होती.
या वर्षभरात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत कांतारा सध्या आठव्या स्थानी आहे. या यादीत केजीएफ 2, RRR, पोन्नियिन सेल्वन 1, ब्रह्मास्त्र, विक्रम, द काश्मीर फाईल्स आणि भुल भुलैय्या 2 हे चित्रपट पहिल्या सातमध्ये समाविष्ट आहेत.