मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : फोटोत गोलू मोलू दिसणारा हा छोटा मुलगा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याने अगदी शून्यातून सुरुवात केली आणि स्वतःच्या दमावर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात या अभिनेत्याने बराच संघर्ष केला. या अभिनेत्याची मुंबईतल्या चाळीशी विशेष जवळीक आहे. कारण जवळपास तीन दशकं ते चाळीत राहिले. आजही त्यांच्या बोलण्यातून आणि राहणीमानातून तोच साधेपणा जाणवतो. बॉलिवूड इंडस्ट्रीत हे आपल्या बोलण्याच्या खास स्टाईलसाठीही ओळखले जातात. फोटोतील या चिमुकल्याला तुम्ही ओळखलात का?
या क्युट मुलाला तुम्ही अजूनही ओळखू शकला नसाल तर हा फोटो अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आहे. जॅकी श्रॉफ यांचे चित्रपट हिट झाल्यानंतरही ते बरीच वर्षे चाळीतच राहायचे. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून त्यांना मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटाने त्यांचं नशीबच पालटलं होतं. यामध्ये मीनाक्षी शेषाद्रीसोबत त्यांची जोडी सुपरहिट ठरली होती आणि जॅकी श्रॉफ रातोरात स्टार बनले होते. त्यांना आपल्या चित्रपटात साइन करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी रांगच लावली होती.
फिल्म इंडस्ट्रीत यश मिळाल्यानंतरही जॅकी श्रॉफ बरीच वर्षे चाळीत राहत होते. खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं की चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही त्यांनी चाळ सोडली नव्हती. त्या चाळीत सात कुटुंबीयांसाठी तीन टॉयलेट होते. मात्र जॅकी यांच्यासाठी चाळीतल्या लोकांनी एक टॉयलेट वेगळा ठेवला होता. कारण सकाळी लवकर उठून त्यांना शूटिंगला जावं लागायचं. म्हणूनच त्यांच्यासोबत राहणाऱ्या चाळीतल्या इतर लोकांनी खास जॅकी श्रॉफ यांना ही सुविधा दिली होती. पहिला चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांना साइन करण्यासाठी रांग लावली होती. अशावेळी जेव्हा ते जॅकी श्रॉफ यांच्या चाळीतल्या घरी पोहोचायचे, तेव्हा ते टॉयलेटमध्ये असल्याचं कळताच टॉयलेटबाहेर ते प्रतीक्षा करत उभे राहायचे.
जॅकी श्रॉफ 33 वर्षे ज्या चाळीत राहिले, त्या चाळीला त्यांनी काही दिवसांपूर्वीच भेट दिली होती. तिथे त्यांनी 89 वर्षीय आजीचा वाढदिवस साजरा केला आणि चाळीतल्या इतर जुन्या मित्रांचीही त्यांनी भेट घेतली. चाळीसाठी माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल, असं जॅकी त्यावेळी म्हणाले होते.