मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : समुद्रकिनारी आईच्या कुशीत दिसणारी ही छोटीशी मुलगी आज दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे, ही अभिनेत्री तिच्या साधेपणासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीत सौंदर्याचं खूप महत्त्व असतं. मात्र कोणत्याही मेकअपशिवाय आपण सुंदर दिसू शकतो आणि आपला साधेपणा हेच मोठं सौंदर्य असतं असं अभिनेत्रीने तरुणींना पटवून दिलं. करिअरच्या शिखरावर असणारी ही अभिनेत्री सौंदर्यासोबतच अभिनय आणि डान्समुळेही लोकप्रिय आहे. इतकंच नव्हे तर शिक्षणातही तिने बाजी मारली आहे. डॉक्टरची पदवी मिळवल्यानंतर या अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. लहानपणी तिला एका लव लेटरमुळे चांगलाच मार खावा लागला होता. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का?
फोटोतील ही चिमुकली दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी आहे. साई पल्लवीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. एका मुलाखतीत तिने खुलासा केला होता की, शाळेत एका मुलासाठी लिहिलेल्या लव्ह लेटरबद्दल जेव्हा तिच्या आई-वडिलांना समजलं, तेव्हा त्यांनी तिला चांगलाच मार दिला होता. “खऱ्या आयुष्यात मी एकदाच पत्र लिहिलं होतं. सातवीत असताना शाळेतल्या एका मुलासाठी मी ते पत्र लिहिलं होतं. मात्र दुर्दैवाने मी पकडले गेले आणि त्यावेळी माझ्या आई-वडिलांनी मला खूप मारलं. त्यानंतर मी कोणालाच लव्ह लेटर लिहिण्याचं धाडस केलं नाही,” असं साई म्हणाली होती.
साई पल्लवीने एमबीबीएस पदवी संपादित केली आहे. मात्र तिने अभिनयात करिअर करण्याचं निवडलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ती सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. चित्रपटांमध्ये काम करताना कमीत कमी मेकअपसाठी ती ओळखली जाते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा इतर ठिकाणी ती सर्वसामान्य तरुणींप्रमाणे विना मेकअप दिसून येते. साईला एकदा फेअनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर आली होती. मात्र ही दोन कोटी रुपयांची ऑफर तिने नाकारली. यामुळे ती खूप चर्चेत होती.
करिअरच्या सुरुवातीला साई पल्लवीचा मुरुमाने भरलेला चेहरा पाहून ही अभिनेत्री म्हणून शोभते का, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. मात्र टीकाकारांचे सर्व अंदाज फोल ठरवत साई ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. गोरा रंग, देखणं रुप, नितळ त्वचा अशा सौंदर्याच्या तथाकथित व्याख्यांना साईने छेद दिला. चेहऱ्यावर मुरूम असतानाही तिने मेकअपनं ते लपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट त्यालाच तिने नैसर्गिक सौंदर्य मानत फेअरनेस क्रिमच्या कोट्यवधींच्या जाहिरातींना धुडकावलं होतं.