‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री साकारणार खलनायिका

| Updated on: May 22, 2024 | 4:29 PM

या मालिकेच्या निमित्ताने विशाल निकम आणि पूजा बिरारी ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचसोबत 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेसुद्धा मालिकेत भूमिका साकारणार आहे. यात आता आणखी एका दमदार कलाकाराची भर पडली आहे.

येड लागलं प्रेमाचं मालिकेत ही लोकप्रिय अभिनेत्री साकारणार खलनायिका
विशाल निकम, पूजा बिरारी
Image Credit source: Instagram
Follow us on

येत्या 27 मे पासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका सुरू होत आहे. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेची आणखी एक जमेची बाजू ठरली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही. प्रत्येकाबद्दलच तिच्या मनात एक असूया आहे. अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरंच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे.

स्वार्थी, अप्पलपोटी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी ही शशीकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागत आहे अशी भावना अतिशा नाईक यांनी व्यक्त केली. या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची बातच न्यारी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल.”

हे सुद्धा वाचा

शशीकलाच्या दागिन्यांची, तिच्या साड्यांची नक्कीच चर्चा रंगेल. शशीकलाचा मालिकेतली मुख्य नायिका म्हणजेच मंजिरीवर विशेष राग आहे. मंजिरी या घरात नसती तर एव्हाना शशीकलाने संपूर्ण घर आपल्या नावावर करुन घेतलं असतं. मंजिरीच्या सुरळीत होणाऱ्या गोष्टींमधे अडचणी आणून त्या कुटुंबाची कोंडी करायची हे काम शशीकला नेटानं करत असते. शशीकलाचे डाव यशस्वी होतात का, हे प्रेक्षकांना मालिकेत पहायला मिळेल. ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका येत्या 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

या मालिकेत ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता विशाल निकम मुख्य भूमिका साकारतोय. त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बिरारी स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेसुद्धा मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्रं आहेत. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.