‘टायगर 3’ची डरकाळी, 2 दिवसात बॉक्स ऑफिसवर कमाईची आतषबाजी, किती कोटींचा जमवला गल्ला?

| Updated on: Nov 14, 2023 | 9:13 AM

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'टायगर 3' या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. सलमानने 'जवान' आणि 'गदर 2'ला मागे टाकलं आहे.

टायगर 3ची डरकाळी, 2 दिवसात बॉक्स ऑफिसवर कमाईची आतषबाजी, किती कोटींचा जमवला गल्ला?
Tiger 3
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘टायगर 3’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करतोय. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी पहिल्या दिवसापासून थिएटरमध्ये गर्दी केली. 12 नोव्हेंबर रोजी ब्लॉकबस्टर ओपनिंगनंतर आता ‘टायगर 3’ने दुसऱ्या दिवशीही धुवाधार कमाई केली आहे. रविवारनंतर सोमवारच्याही परीक्षेतही सलमानचा चित्रपट यशस्वी ठरला आहे. ‘टायगर 3’ने दुसऱ्या दिवशी भारतात 57.50 कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई हिंदी, तेलुगू आणि तमिळ या तीन भाषांची मिळून आहे.

‘टायगर 3’ने पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी 57.50 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 100 कोटींपेक्षा अधिक झाला आहे. सलमान आणि कतरिनाचा ‘टायगर 3’ हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत ‘टायगर 3’ने शाहरुख खानचा ‘जवान’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ला मागे टाकलं आहे.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

पठाण- 70.50 कोटी रुपये
टायगर 3- 57.50 कोटी रुपये
जवान- 53 कोटी रुपये
गदर 2- 43.8 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

‘टायगर 3’च्या कमाईचा वेग असाच कायम राहिला तर सलमान आणि कतरिनाच्या करिअरमधील हा सर्वांत मोठा चित्रपट बनू शकतो. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफसोबतच इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहेत. तर शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय रेवती, सिमरन, रिधी डोग्रा, विशाल जेठवा, कुमूद मिश्रा, रणवीर शौरी आणि आमिर बशीर यांच्याही भूमिका आहेत. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा हा पुढील भाग आहे.

सुरुवातीपासूनच ‘टायगर 3’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे पहिले दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. त्यामुळे तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. म्हणूनच पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे.

‘टायगर 3’ हा चित्रपट सलमान खानचा सर्वांत मोठा ‘ओपनर’ ठरला आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अली अब्बास जफरच्या ‘भारत’ आणि त्याआधी 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांना ‘टायगर 3’ने मात दिली आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते. ‘भारत’ने 42.30 कोटी रुपये आणि ‘प्रेम रतन धन पायो’ने 40.35 कोटी रुपये कमावले होते.