ब्रेन स्ट्रोकनंतर आता टिकू तलसानिया यांची प्रकृती कशी? मुलीने दिली माहिती

| Updated on: Jan 13, 2025 | 9:39 AM

कॉमेडी भूमिकांसाठी लोकप्रिय असलेले अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेक स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीविषयी मुलगी शिखा तलसानियाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. टिकू यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेन स्ट्रोकनंतर आता टिकू तलसानिया यांची प्रकृती कशी? मुलीने दिली माहिती
Tiku Talsania
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता मुलगी शिखा तलसानियाने माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित शिखाने वडिलांच्या प्रकृतीविषयी सांगितलं आहे. त्याचसोबत तिने चाहत्यांचे, डॉक्टरांचे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात टिकू यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि काळजीबद्दल धन्यवाद. हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत भावनिक काळ होता. पण आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की बाबा आता खूप बरे आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.’

टिकू यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र रविवारी त्यांची पत्नी दिप्ती तलसानिया यांनी गैरसमज दूर केला. टिकू यांना हृदयविकाराचा झटका नाही तर ब्रेन स्ट्रोक आल्याचं त्यांनी सांगितलं. एनडीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, हार्ट अटॅक नाही. ते एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेले होते आणि रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्याथ आलं.”

शिखा तलसानियाची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

टिकू यांनी बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जातात. ‘राजा हिंदुस्तानी’, ‘अंदाज अपना अपना’, ‘इश्क’, ‘कभी हाँ कभी ना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले. राजीव मेहरा यांच्या ‘प्यार के दो पल’ (1986) या चित्रपटातून त्यांनी हिंदी कलाविश्वातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘दिल है के मानता नहीं’, ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘मिस्टर बेचारा’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांच्या आताच्या चित्रपटामध्ये रणवीर सिंहचा ‘सर्कस’ आणि राजकुमार राव-तृप्ती डिमरी यांचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ यांचा समावेश आहे.