‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने निर्मात्यांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी पलकवर करार मोडल्याचा आरोप करत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर पलकने स्पष्ट केलं की तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून निर्माते तिला जाणूनबुजून त्रास देत आहेत. पलकने दुसऱ्या ब्रँडसोबत जाहिराती केल्याचा आरोप करत निर्मात्यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या आरोपांना पलकने फेटाळून लावलं आहे. पाच वर्षांपूर्वीच मालिकेसोबत करार करताना निर्मात्यांनी इतर ब्रँड्ससोबत जाहिराती करण्याची परवानगी दिली होती, असं पलकने स्पष्ट केलंय.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पलक म्हणाली, “मुनमुन दत्ता, मंदार चांदवडकर, सुनैना फौजदार यांसारखे मालिकेतील इतर कलाकारसुद्धा जाहिराती करतात. पण फक्त मलाच नोटीस बजावली जातेय. माझी तब्येत बरी नसताना मी निर्माते असित कुमार मोदी यांना मेसेज केला होता. सर, माझी प्रकृती ठीक नाही आणि नोटिशीमुळे बराच मानसिक ताण झालाय, असं त्यांना म्हटलं होतं. तुमच्या टीमपैकी कोणी माझ्याशी भेटू शकतं का, असं मी त्यांना विचारलं होतं. पण निर्मात्यांनी मला सांगितलं की 18 सप्टेंबरपर्यंत कोणीच माझ्याशी भेटू शकत नाही. मला विविध लोकांशी बोलण्यास सांगितलं होतं पण कोणीच माझी मदत करत नव्हतं. मानसिक तणावात मी पाच-सहा दिवस शूटिंग करत होती.”
“माझ्यासोबत नेमकं काय होतंय हेच मला समजत नव्हतं. लोक मला मला सतत फोन करत होते. मी खरंच करार मोडलाय का, विचारत होते. मला सेटवर सततच्या तणावामुळे पॅनिक अटॅक्ससुद्धा आले होते. मी अक्षरश: थरथर कापत होती. कंपनीच्या प्रतिनिधींनी मला पाहिलं होतं आणि त्यांनी निर्मात्यांना याविषयी नक्कीच सांगितलं असणार. पण तरीसुद्धा असित कुमार मोदी यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मला रात्रभर झोप लागत नव्हती. हे प्रकरण मिटवण्यासाठी मी पुन्हा निर्मात्यांना मेसेज केला. अखेर 18 सप्टेंबर रोजी मी त्यांना भेटले आणि करारात इतर जाहिराती न करण्याची कोणतीच अट नव्हती हे स्पष्ट केलं. त्यावर ते मला म्हणाले की, प्रत्येक कलाकाराचा करार वेगळा असतो. त्यांनी मला माझं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट करण्याची धमकी दिली. गेल्या पाच वर्षांत प्रॉडक्शन टीमने कधीच माझ्या जाहिरातींवर आक्षेप घेतला नव्हता. पण ज्याक्षणी मी मालिका सोडण्याचा निर्णय सांगितला, तेव्हापासून त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली”, असं तिने पुढे सांगितलं.