फ्लॉरिडा : गेल्या वर्षी हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझच्या ‘टॉप गन : मॅवरिक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याच्या आगामी ‘मिशन इम्पॉसिबल 7’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. टॉमचं प्रोफेशनल आयुष्य इतकं यशस्वी असताना त्याच्या खासगी आयुष्यातील समस्या मात्र आजही कायम आहेत. टॉम त्याची मुलगी सुरीला गेल्या दहा वर्षांपासून भेटू शकला नाही. केटी होम्सशी घटस्फोट झाल्यानंतर टॉम क्रूझ आणि त्याच्या मुलीमध्ये हा दुरावा आला.
टॉम क्रूझ आणि केटी होम्स यांची मुलगी सुरीचा जन्म 2006 मध्ये झाला. ती आता 17 वर्षांची आहे आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे. 2011 मध्ये टॉम आणि केटी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केटीला मुलीचा ताबा मिळाला. आता सुरी तिच्या आईसोबत न्यूयॉर्कमध्ये राहते. अत्यंत सुंदर दिसणारी सुरी तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.
टॉम क्रूझने आतापर्यंत तीन लग्न केले आहेत. केटीसोबतचं त्याचं तिसरं लग्न होतं. घटस्फोटानंतर टॉमने केटी आणि मुलीसोबत काहीच संपर्क ठेवला नाही. यामागचं कारण केटी असल्याचं म्हटलं जातं. आपल्या मुलीने टॉमची भेट घ्यावी, हे तिला अजिबात पसंत नाही. घटस्फोटावेळी झालेल्या करारानुसार टॉम दरवर्षी केटीला 3.30 कोटी रुपये पोटगी म्हणून देतो. जोपर्यंत सुरी 18 वर्षांची होत नाही, तोपर्यंत टॉमला ही पोटगी द्यायची आहे.
सुरी आता कॉलेजमध्ये दाखल होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अर्ज करत आहे. मात्र तिने न्यूयॉर्कमध्येच राहावं, अशी आई केटीची इच्छा आहे. टॉमला 2013 पासूनच सुरीपासून दूर करण्यात आलं होतं. टॉमने एका मुलाखतीत हे मान्य केलं होतं की घटस्फोटानंतर तो सुरीच्या आयुष्यापासूनही दूर निघून गेला. मी मुलीला भेटणं तर दूर, पण तिला पाहूसुद्धा शकलो नाही, असंही त्याने म्हटलं होतं. 2012 मध्ये एका मीडिया पब्लिकेशनच्या विरोधात मानहानीचा खटला लढताना टॉमने कोर्टात म्हटलं होतं, ‘जेव्हा घटस्फोटो होतो तेव्हा अनेक गोष्टी बदलून जातात. ही परिस्थिती कोणत्याच बाजूने चांगली नसते.’
त्याचवेळी टॉमला केटीपासून विभक्त होण्यामागचं कारण विचारण्यात आलं होतं. वादग्रस्त चर्च ऑफ साइंटोलॉजीमधील आस्थेमुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का, असा प्रश्न विचारला असता टॉमने त्यावर होकारार्थी उत्तर दिलं. 1986 मध्ये टॉम क्रूझने त्याची पहिली पत्नी मिमी रोजर्सला साइंटोलॉजीमध्ये कन्वर्ट केलं होतं. 2000 साली त्याने चर्च ऑफ साइंटोलॉजीचं समर्थन केलं होतं.
चर्च ऑफ साइंटोलॉजी त्यांच्या सदस्यांना अशा लोकांशी संबंध तोडण्यास किंवा कोणताही संपर्क न ठेवण्यास सांगते, जे त्यावर विश्वास ठेवत नाहीत. माजी साइंटोलॉजिस्ट लिआ रेमिनी यांनी 2020 मध्ये ‘द पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, साइंटोलॉजी केटी होम्सला त्यांचा शत्रू मानते. कारण ती त्यांच्या प्रथांमध्ये विश्वास ठेवत आहे आणि याच कारणामुळे त्यांची मुलगी सुरी वडिलांसोबत कोणताच संपर्क ठेवू शकत नाही. टॉम क्रूझ हा जगातील सर्वांत हाय-प्रोफाइल साइंटोलॉजिस्टपैकी एक आहे.