प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव-ईश्वरीची हटके लव्हस्टोरी; ‘तू ही रे माझा मितवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

| Updated on: Nov 18, 2024 | 2:53 PM

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव-ईश्वरीची ही हटके लव्हस्टोरी आहे.

प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव-ईश्वरीची हटके लव्हस्टोरी; तू ही रे माझा मितवा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
शर्वरी जोग, अभिजीत आमकर
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रेम कुणाचे नाही कुणावर… प्रेम असे आभासच केवळ
प्रेम असावी एक कल्पना… प्रेम मनातील व्यर्थ भावना
सोडूनी अर्ध्यावर जाते कोणी कुणा…आठवांच्या उरती छळणाऱ्या खुणा
तरी ही चाहूल गोड कुणाची जिवाला ओढ लावी
का नाव कुणाचे घेता ही रात दरवळून यावी
ह्या मनात रुजलेला कोणाचा गोडवा… तू ही रे माझा मितवा…

लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेलं हे शीर्षकगीत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट सांगून जातं. या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्तहटलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत राहताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “तू ही रे माझा मितवा ही एक युवा प्रेम कहाणी आहे. या मालिकेतून परस्पर नातेसंबंध उलगडतीलच पण या दोन प्रमुख पात्रांध्ये एक नवी केमिस्ट्री पाहायला मिळेल. प्रेम आहे पण व्यक्त होता येत नाही, राग आहे पण प्रेमामुळे रोखून ठेवलंय अशी ही दोन विरुद्ध माणसांची प्रेम कहाणी फुलत जाईल जी रसिकांना नक्की आवडेल.”

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने केली आहे. शैलेश शिर्सेकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवी मालिका येत्या 23 डिसेंबरपासून रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.