मुंबई : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनानंतर ५० व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूर आणि अभनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkar) सिनेमाच्या कमाईला सातव्या दिवशी ब्रेक लागला आहे. सिनेमा प्रदर्शित होवून एक आठवडा झाला आहे. विकेंडच्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. पण आता बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा बोलबाला कमी होताना दिसत आहे. सातव्या दिवशी सिनेमाने कमी कमाई केल्यानंतर येणाऱ्या दिवसांचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता रणबीर आणि श्रद्दा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ येणाऱ्या दिवसांत किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाने सात दिवसांत जवळपास ८१.९४ – ८२.०४ कोटी रुपयांचा गल्ला जमा केलं आहे. सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी १५.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. गुरुवारी सिनेमाने १०.३४ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. शुक्रवारी सिनेमाने १०.५२ कोटी रुपयांची कमाई केली.
शनिवारी आणि रविवारी सु्ट्टी असल्यामुळे सिनेमाने क्रमशः १६.५७ कोटी आणि १७.०८ कोटी रुपयांची कमाई केली. पण सोमवार आणि मंगळवार सिनेमासाठी लाभदायक ठरला नाही. सोमवारी सिनेमाने ६.०५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर मंगळवारी सिनेमाने ५.६५ – ५.७५ रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमाच्या कमाईचा आकडा कमी होत असल्यामुळे सिनेमा १०० कोटी रुपयांच्या घराच पोहोचेल का? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सांगायचं झालं तर, २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या सिनेमाने आतापर्यंत फक्त ८१.९४ – ८२.०४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा या सेलिब्रिटींची देखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमानंतर रणबीर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात दिसणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमासाठी रणबीर कपूर याने मानधन घेतलेलं नाही. याचा खुलासा खुद्द दिग्दर्शक लव रंजन यांनी केला आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाबद्दल लव रंजन म्हणाले, ‘रणबीर याने सिनेमात काम करण्यासाठी माझ्याकडून आतापर्यंत कधीही पैसे घेतलेले नाहीत. अनेकदा आपल्याला समोरच्याला सांगावं लागतं मला या गोष्टीची गरज आहे. पण गेल्या ४ वर्षांपासून रणबीर याने मला कधीही निराज केलं नाही..’ सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.