मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी पहिल्यांदाच आरोपी शिझान खानच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही यावर बोलू, असं ते म्हणाले. त्याचसोबत त्यांनी खासगी आयुष्याचा आदर करावा अशी विनंती नेटकरी आणि माध्यमांना केली. तुनिशाची आई वनिता यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अभिनेता शिझानला अटक केली.
शिझानची बहीण शफक नाज आणि फलक नाज यांनी म्हटलंय, “या कठीण काळात कृपया आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा. हे पाहून आम्हाला वाईट वाटतंय की लोक सतत आम्हाला फोन करत आहेत आणि माध्यमाचे प्रतिनिधी आमच्या इमारतीखाली उभे आहेत.”
“या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. चौकशीदरम्यान शिझान मुंबई पोलिसांना सहकार्य करतोय. योग्य वेळ आल्यावर आम्ही यावर बोलू. मात्र कृपा करून सध्या आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा, ज्यावर आमच्या कुटुंबीयांचा हक्क आहे”, अशी विनंती त्यांनी केली.
शिझानचे अनेक मुलींशी प्रेमसंबंध होते. त्याने तुनिशालाही लग्नाचं आमिष दाखवून फसवलं आणि त्यामुळेच तिने आत्महत्या केली, अशा आरोप तुनिशाची आई वनिता यांनी सोमवारी केला. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तुनिशाच्या आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व शक्यता पडताळून तपास करत आहेत.
वनिता यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून शिझानवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, तुनिशाच्या पार्थिवावर आज (मंगळवार) दुपारी 3 वाजता मिरा रोड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पोलिसांनी सेटवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सेटवरील सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणात घातपात दिसून येत नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.