मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अभिनेता शिझान खानवर गंभीर आरोप केले. याचसोबत त्याने तुनिशाच्या हत्येचा संशय व्यक्त केला. ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझानला पोलिसांनी अटक केली आहे.
“ख्रिसमसला तुनिशा चंदीगडला दोन दिवसांसाठी जाणार होती. तिला भेटता येणार नाही म्हणून मी त्यादिवशी सेटवर जाण्याचा विचार करत होती. मात्र तेव्हाच सेटवरून ईपी प्रशांत यांचा फोन आला. तुनिशा बऱ्याच वेळापासून दरवाजा उघडत नाहीये, तुम्ही लवकरात लवकर इथे या, असं ते म्हणाले. ब्रेकअप झाला तेव्हा शिझान तिला म्हणाला, तुला जे करायचं ते करं. तुनिशा लहान होती, संवेदनशील होती आणि खूप भोळी होती. शिझानने तिला असं म्हणायला पाहिजे नव्हतं. त्याने तुनिशाचा खूप वापर केला. ही मर्डर केस पण असू शकते”, असा आरोप वनिता शर्मा यांनी केली.
“तुनिशाने एकदा शिझानचा फोन तपासला होता. तेव्हा तो आपली फसवणूक करतोय, हे तिला समजलं. याविषयी विचारलं तेव्हा त्याने तुनिशाला कानाखाली मारली. माझ्या मुलीला कोणताच आजार नव्हता. मी शिझानला सोडणार नाही. तो सेटवर ड्रग्ज घ्यायचा, हे मला तुनिशाने सांगितलं होतं. शिझानमुळे तुनिशाच्या स्वभावातही नंतर खूप बदल झाले. इस्लाम धर्माचं पालन करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. इन्स्टाग्रामवर तिने सकाळी पोस्ट अपलोड केली होती, मग नंतर असं काय घडलं? आम्हाला काहीच माहीत नाही”, असं त्या पुढे म्हणाल्या.
I will not sit quietly until Sheezan is punished. Tunisha checked his phone once & found that he was cheating on her. On questioning Sheezan, he slapped her. My daughter had no disease. I will not spare Sheezan. My daughter has gone, I’m alone now: Vanita Sharma, Tunisha’s mother pic.twitter.com/BwEQRVVkUo
— ANI (@ANI) December 30, 2022
“तुनिशाने त्याला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्याची आई तिला सतत फोन करायची. अम्मा मुझे बहुत डिस्टर्ब कर रही है, असं ती मला सांगायची. तुनिशाचा धर्म वेगळा आहे, ती वयाने लहान आहे, या गोष्टी शिझानला आधीच माहीत नव्हत्या का? तरीसुद्धा त्याने तिच्याशी जवळीक वाढवली. शिझानची बहीण तिला टॅटू काढण्यासाठी घेऊन गेली होती. इतकं सगळं झाल्यानंतर तिला का सोडलं? मध्यंतरी दोन-तीन महिने ती माझ्यापासून दूर होती. ते जसं सांगतील तसं करायची”, असे आरोप वनिता यांनी शिझानच्या कुटुंबीयांवर केले.
आत्महत्येनंतर तुनिशाला सेटवर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळाली नाही, असाही आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. “तुनिशाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पंधरा मिनिटांपर्यंत तिकडे कोणतीच गाडी नव्हती, ॲम्ब्युलन्स बोलावली नव्हती. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा तिच्या मृत्यूला अर्धा तास झाल्याचं डॉक्टर म्हणाले”, असं तुनिशाचे काका म्हणाले.