मुंबई : ‘अली बाबा: दास्तान- ए- काबुल’ या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता शीझान खान गेल्या काही महिन्यांत बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आलेल्या वादळाचा फटका केवळ शीझानलाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनाही बसला. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी शीझानने बरेच दिवस तुरुंगात घालवले. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबीय सातत्याने प्रयत्न करत होते. तुनिषाच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी शीझानला अटक केली होती. आता इतक्या दिवसांनंतर त्याच्या घरात आनंदाचे दिवस परतले आहेत.
शीझानची बहीण शफक नाजचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. शफक तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत तिचा साखरपुडा पार पडणार असल्याचं कळतंय. हे एक अरेंज्ड लव्ह मॅरेज आहे. मात्र या निमित्ताने शीझानच्या कुटुंबात बऱ्याच दिवसांनंतर आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. शफक ज्या व्यक्तीशी साखरपुडा करणार आहे, जो टीव्ही इंडस्ट्रीतला नसल्याचं समजतंय. या साखरपुड्यामुळे आपले कुटुंबीय प्रकाशझोतात यावेत, अशी मुलाची इच्छा नाही. म्हणूनच मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ पार पडेल.
तुनिशा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी वसईतील तिच्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शिझानसोबत असलेलं प्रेमसंबंध तुटल्याने ती नैराश्यात होती. तिच्या आत्महत्येला शिझान हाच जबाबदार असल्याचा आरोप तुनिशाच्या आईने केला होता. त्यानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत शिझानला तुनिशाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “मला तिची आठवण येतेय. जर ती आज जिवंत असती तर माझ्यासाठी ती लढली असती.” तुनिशाच्या आत्महत्येच्या पंधरा दिवस आधी तिचं शिझानसोबत ब्रेकअप झालं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने शिझानच्या जामिनाचा निर्णय वसई सत्र न्यायालयाकडे सोपवला होता. या खटल्यासाठी तुनिशाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ताची नियुक्ती करण्यात आली होती.
तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात लव्ह-जिहादच्या अँगलने तपास करावा, अशी मागणी तिच्य्या काकांनी केली होती. हे 100 टक्के लव्ह-जिहादचं प्रकरण आहे, असा दावा त्यांनी केला होता.