मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या पार्थिवावर मंगळवारी भाईंदर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोपी शिझान खानची आई आणि बहीणही उपस्थित होती. तुनिशाने शनिवारी दुपारी वसई इथल्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघं ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत एकत्र काम करत होते. तुनिशाच्या अंत्यविधीला टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारही उपस्थित होते.
लेकीला अंतिम निरोप देताना तुनिशाची आई वनिता शर्मा या अत्यंत भावूक झाल्या होत्या. तुनिशाच्या पार्थिवाला तिच्या काकांनी मुखाग्नी दिला. लाल साडीत 20 वर्षीय तुनिशाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. लाल रंगाच्या साडीतील तिचं पार्थिव स्मशानभूमीवर आणलं होतं. यामागचं कारण तुनिशाच्या काकांनी एका मुलाखतीत सांगितलं.
“तुनिशाला लाल रंग खूप आवडायचा. ज्या रंगाच्या साडीत तुनिशाला अखेरचा निरोप दिला, तो रंग तिचा खूप आवडता होता. म्हणून आम्ही लाल साडीत तुनिशाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले”, असं त्यांनी सांगितलं.
तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. तुनिशाच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जातेय. तिचे काका पवन शर्मा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पोलिसांनी तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात लव्ह-जिहादच्या अँगलने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे 100 टक्के लव्ह-जिहादचं प्रकरण आहे, असा दावा त्यांनी केला आहे.