Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येमुळे कुटुंबासोबत चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तुनिशाने बॉयफ्रेंड शीजान खानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. तुनिशा आत्महत्या प्रकरणात शीजानला चार दिवसांची पोलिसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
शनिवारी तुनिशाने जगाचा अखेरचा निरोप घेतला. लेकीच्या निधनानंतर तुनिशाच्या आईने शीजानवर गंभीर आरोप केले आहेत. शीजानला कठोर शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया तुनिशाच्या आईने दिली आहे. सध्या तुनिशाच्या आईने अभिनेत्यावर केलेले आरोप चर्चेचा विषय ठरत आहेत.
शीजानवर आरोप करत अभिनेत्रीची आई म्हणाली, ‘शीजानने तुनिशाला फसवलं आहे. शीजान तुनिशासोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्याने तुनिशाला लग्न करण्याचं वचन देखील दिलं होतं. पण तुनिशाच्या आधी त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती.’
तुनिशाच्या आई पुढे म्हणाल्या, ‘शीजानच्या आयुष्यात आधी एक मुलगी असताना देखील त्याने जवळपास 4 महिने माझ्या मुलीचा वापर केला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. माझं बाळ गेलं…’ अशी भावना तुनिशाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.
कायम आनंदी राहणाऱ्या तुनिशाच्या आत्महत्येमुळे आईला मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या निधनानंतर तुनिशाने आईला सांभाळलं. तुनिशाच्या आईने सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला. तुनिशाचं कुटुंब अभिनेत्रीवर आधारलेलं होतं. अशात अभिनेत्रीने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण
तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.