वसई: ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेतील अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनं सर्वांनाच मोठा धक्का बसला. अवघ्या 21 व्या वर्षी तुनिशाने या जगाचा निरोप घेतला. तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. तुनिशाच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जातेय. आता तिचे काका पवन शर्मा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पोलिसांनी तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात लव्ह-जिहादच्या अँगलने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे 100 टक्के लव्ह-जिहादचं प्रकरण आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहअभिनेता शिझान खान अटकेत आहे.
माध्यमांशी बोलताना तुनिशाचे काक पवन शर्मा म्हणाले, “माझ्या मते हे 100 टक्के लव्ह-जिहादचं प्रकरण आहे. पोलिसांनी याचा विशेष पद्धतीने तपास केला पाहिजे. या प्रकरणाचा पोलिसांनी प्रत्येक अँगलने तपास केला पाहिजे. ही आत्महत्या आहे की आणखी काही.. हे आम्हाला माहीत नाही. आमच्याकडे कोणतंच व्हिडीओ रेकॉर्डिंग नाही.”
यावेळी बोलताना तुनिशाच्या काकांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले. “पोलीस या प्रकरणाला आत्महत्या म्हणत आहेत. मात्र त्यांनी संपूर्ण तपास करावा आणि त्यानंतर ही आत्महत्या आहे की नाही ते सांगावं. पोलिसांनी आतापर्यंत कुटुंबीयांपैकी कोणाचाच जबाब नोंदवलेला नाही”, असंही ते म्हणाले.
तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शिझान खानला अटक केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जातेय. मात्र तुनिशाच्या प्रकरणात लव्ह-जिहादचा कोणताच अँगल नसल्याचं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
तुनिशा शर्माच्या पार्थिवावर मंगळवारी भाईंदर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोपी शिझान खानची आई आणि बहीणही उपस्थित होती. तुनिशाने शनिवारी दुपारी वसई इथल्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.