मुंबई- प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं निधन झालं. जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांत अचानक बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटं त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र सिद्धांतची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सिद्धांतचं खरं नाव आनंद सूर्यवंशी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नाव बदलून सिद्धांत वीर सूर्यवंशी असं केलं होतं. सिद्धांत 46 वर्षांचा होता.
झी टीव्हीवरील ‘ममता’ या मालिकेत अक्षयची भूमिका साकारून सिद्धांत प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. कुसुम या मालिकेतून त्याने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर कृष्णा अर्जुन, कसौटी जिंदगी की, जमीन से आसमां तक, विरुद्ध, भाग्यविधाता, क्या दिल मै है यांसारख्या मालिकेत त्याने भूमिका साकारल्या. स्टार प्लस वाहिनीवरील ‘गृहस्ती’ या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली.
2001 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या सिद्धांतने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये 20 हून अधिक मालिकांमध्ये काम केलंय. विरुद्ध या मालिकेतील भूमिकेसाठी त्याला इंडियन टेली अवॉर्ड्ससुद्धा मिळाला होता.
याआधी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. जवळपास महिनाभर उपचारानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवील होती. सिद्धांतच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र जिममध्ये वर्कआऊट करतानाच बेशुद्ध झाल्याने कार्डिॲक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज वर्तवला जातोय.