अभिनेत्री डिंपल कपाडियाने करिअरच्या शिखरावर असताना अभिनय क्षेत्रात काम करणं सोडून दिलं होतं. डिंपलने एकाच चित्रपटात काम केलं आणि राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर ती कौटुंबिक जबाबदारीत रमून गेली. दोन मुलींचा सांभाळ करताना त्याच दशकभरात डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या उद्भवू लागल्या होत्या. त्याला राजेश खन्ना यांचा अहंकार कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जातं. अखेर 1980 मध्ये ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींसोबत डिंपने राजेश खन्ना यांचं घर सोडलं. 1990 मध्ये ‘मूव्ही’ मॅगझिनसाठी राजेश खन्ना यांनी करिअरमधील त्यांच्या सर्वांत मोठ्या शत्रूसोबत म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दोन्ही कलाकारांना त्यांच्या पत्नीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी लग्नानंतर त्यांच्या पत्नींना काम करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला होता.
या मुलाखतीत राजेश खन्ना म्हणाले की जेव्हा त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना मोठी झाली, तेव्हा त्यांनी तिला अभिनयक्षेत्रात जाण्यास प्रोत्साहन दिलं होतं. पण त्यावेळी ट्विंकलच्या मनात प्रश्न होता की जर तुम्ही मला परवानगी देत आहात, तर मग आईला काम करण्याची परवानगी का नव्हती? राजेश खन्ना म्हणाले, “मला माझ्या पत्नीच्या कामाबाबत काहीच समस्या नव्हती. पण जेव्हा मी डिंपलशी लग्न केलं, तेव्हा मला माझ्या मुलांसाठी एक आई हवी होती. नोकरांनी माझ्या मुलांना मोठं करावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती आणि मला डिंपलच्या प्रतिभेची अजिबातच जाणीव नव्हती. तेव्हा बॉबी हा तिचा चित्रपट प्रदर्शितसुद्धा झाला नव्हता. नुकतंच जेव्हा मी माझी मुलगी ट्विंकलला सांगितलं की जर तिला चित्रपटांमध्ये काम करायचं असेल तर मी तिच्यासाठी एखाद्या चित्रपटाची निर्मिती करू शकतो. त्यावर तिने मला प्रश्न विचारला की, तुम्ही मला अभिनयाची परवानगी देत आहात, पण मग आईला का नाही दिली? त्यावर मी तिला म्हणालो, की यामागचं खूप साधं कारण आहे की मी तुझा पिता आहे, पती नाही.”
“याशिवाय जर मला त्यावेळी समजलं असतं की बॉबी या चित्रपटामुळे तिच्या प्रतिभेला नवी ओळख मिळेल, तर मी तिला कधीच थांबवलं नसतं. एखाद्या प्रतिभेला ठेचणं ही क्रूरता आहे. जेव्हा मी तिचा बॉबी हा चित्रपट पाहिला, तोपर्यंत माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला होता. मी टिना मुनिमचंही करिअर संपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मी तिच्यासाठी चित्रपट बनवला होता. आम्ही दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तिला तर काम करण्यात फार रसही नव्हता. उलट मी तिला म्हणायचो की, काम कर. तुझ्या चौकटीतून बाहेर पड. मला पुन्हा तीच चूक करायची नाही”, असं राजेश खन्ना यांनी स्पष्ट केलं.
1990 च्या मध्यात जेव्हा करिअरला उतरती कळा लागली असताना राजेश खन्ना दिल्लीला राहायला गेले, तेव्हा त्यांनी मुलगी ट्विंकलच्या एका लाँच कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ट्विंकलला काही सल्ला देणार का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “ती नेहमीच मला विविध गोष्टींच्या बाबतीत सल्ले विचारते. मी तिला इतकंच म्हणतो की जेव्हा मी करिअरची सुरुवात केली तेव्हा या इंडस्ट्रीत माझा कोणीच गॉडफादर नव्हता. त्यामुळे तू सुद्धा पुढे जाण्यासाठी तुझे प्रयत्न करत राहा, तुझा मार्ग शोधत राहा. मी तिला हेसुद्धा सांगितलंय की तुझ्या आईकडूनही सल्ला घेऊ नकोस, कारण आईकडून सल्ला घेतल्यावर तिच्या मनात आणखी संभ्रम निर्माण होईल.”