मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना अनेकदा तिच्या आयुष्याविषयी, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी, कुटुंबीयांविषयी रंजक किस्से वाचकांसोबत शेअर करते. नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात तिने मुलगा आरवसोबतच्या नात्याबद्दल लिहिलं आहे. ट्विंकलने आरवला त्याच्या मोबाइल फोनचा पासवर्ड विचारला होता. त्यावेळी मुलाने दिलेलं उत्तर ऐकून ती थक्क झाली होती. ट्विंकलने सांगितलं की तिचा 21 वर्षांचा आरव आणि 11 वर्षांची मुलगी नितारा हे डॉक्टरकडे जात आहेत की नाही, याबद्दल तिला जाणून घ्यायचं होतं. यासाठी तिने हेल्थ इन्श्युरन्स एजंटकडे आपल्या मुलांचा रेकॉर्ड मागितला होता.
हेल्थ इन्श्युरन्स एजंटने ट्विंकलला सांगितलं की नितारा लहान असल्याने तिचे रेकॉर्ड पालकांसोबत शेअर केले जाऊ शकतात. मात्र आरव आता 21 वर्षांचा असल्याने त्याला त्याच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवण्याचा पूर्ण हक्क आहे. ही गोष्ट ट्विंकलला आवडली नाही आणि तिने मुलाकडे त्याचा पासवर्ड मागितला. त्यावर आरवने साफ नकार दिला. तो तिला म्हणाला, “मॉम, मी संपूर्ण वर्षात फक्त चार वेळाच डॉक्टरकडे गेलोय. तुला त्याबद्दल संपूर्ण माहिती आहे कारण, त्या चारही वेळा माझ्यासोबत डॉक्टरकडे येण्याचा हट्ट तू केला होतास. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मात्र मी माझा पासवर्ड देणार नाही. कारण आता मी 21 वर्षांचा आहे, 12 नाही. मी माझ्या गोष्टी स्वत: हँडल करू शकतो.”
मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर त्याविषयी ट्विंकलने पती अक्षयला सांगितलं. तेव्हा अक्षयने आणि आई डिंपल कपाडियाने ट्विंकलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. “तेव्हा मला जाणवलं की माझ्या मुलावर आता सतत लक्ष ठेवायची गरज नाही. तो आता मोठा झालाय. आयुष्यातील ही बाब स्वीकारणं माझ्यासाठी जरा कठीण होतं. पण हळूहळू मी त्याबद्दल शिकतेय”, असं तिने पुढे लिहिलं.
आरवने नुकताच त्याचा 21वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अक्षय आणि ट्विंकलने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. ‘हाय मेरे अंग्रेजी पुत्तर. आज तू 21 वर्षांचा झाला आहेस. मात्र माझ्यासाठी तू नेहमीच तो छोटा आरव असशील, जो खोडकरपणे माझ्या मिठीत यायचा आणि संपूर्ण दिवस माझा तुझ्यामागे जायचा. आता तो कायदेशीरपणे त्या सर्व गोष्टी करू शकतो, जे तू आधीपासूनच करत आहेस असा मी अंदाज व्यक्त करतो. मला तुझ्यावर फार अभिमान आहे आणि मी तुझ्यावर सदैव प्रेम करत राहीन’, अशा शब्दांत अक्षय कुमारने भावना व्यक्त केल्या होत्या.