उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा लग्नसोहळा सध्या जगभरात चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, बॉलिवूड सेलिब्रिटी हे अंबानींच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम जल्लोषात पार पडत आहेत. संगीत कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. संगीत कार्यक्रमात बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी स्टेजवर डान्स केला. त्या सेलिब्रिटींसोबतच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरेसुद्धा स्टेजवर नाचताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अनंत आणि राधिकाच्या संगीत कार्यक्रमात सारा अली खान, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, शिखर पहाडिया, वीर पहाडिया या सर्व सेलिब्रिटींनी मिळून ‘बन्नो की सहेली..’ या गाण्यावर डान्स केला. सेलिब्रिटींच्या याच ग्रुपमध्ये मागच्या रांगेत तेजस ठाकरे नाचताना दिसला. यावेळी त्याने काळ्या रंगाची शेरवानी पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. इतर सेलिब्रिटींसोबतच त्यानेसुद्धा संगीत कार्यक्रमात ठेका धरला.
अंबानींचा कार्यक्रम म्हटलं की त्या बॉलिवूड सेलिब्रिटींची आवर्जून हजेरी पहायला मिळते. मात्र यावेळी पहिल्यांदाच तेजस ठाकरेला सेलिब्रिटींसोबत स्टेजवर परफॉर्म करताना पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. तेजसचा हा निराळा अंदाज नेटकऱ्यांना पहिल्यांदाच पहायला मिळाला. ठाकरे कुटुंब हे राजकारणात सक्रिय असलं तरी तेजस राजकारण आणि प्रकाशझोतात येण्यापासून नेहमीच लांब राहतो. “मी प्रत्येक दसरा मेळाव्याला गेलोय. मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. पण तरी लोकांचं माझ्याकडे लक्ष जाणार नाही”, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
संगीत कार्यक्रमानंतर सोमवारी अनंत आणि राधिकाची हळद पार पडली. इतर कार्यक्रमांप्रमाणेच अनंत-राधिकाच्या हळदीला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. सलमान खान, रणवीर सिंह, उदित नारायण, जान्हवी कपूर यांसारखे सेलिब्रिटी हळदीला आवर्जून उपस्थित होते. येत्या 12 जुलै रोजी हा भव्य लग्नसोहळा पार पडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात जामनगरमध्ये अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. त्यानंतर जूनमध्ये आलिशान क्रूझवर पार्टी आयोजित करण्यात आली होती.