मुंबई- बॉलिवूडमध्ये मैत्री या विषयावर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली. मैत्री याच संकल्पनेवर दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटात तरुणांची नाही तर वृद्ध मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, डॅनी डेंझोप्पा, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
अमित श्रीवास्तव (अमिताभ बच्चन), भूपेन (डॅनी), ओम (अनुपम खेर) आणि जावेद (बोमन इराणी) या दिल्लीत राहणाऱ्या चार मित्रांची ही कथा आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून हे मित्र नेहमीच एकमेकांचा वाढदिवस सोबत साजरा करतात. अमित यशस्वी लेखक असतात तर ओम यांचं पुस्तकांचं दुकान आहे. जावेद यांचा कपड्यांचा व्यवसाय असतो तर भूपेन हे एका क्लबचे मालक आणि शेफ असतात.
आपल्या मित्रांना आपली जन्मभूमी नेपाळच्या पर्वतांमध्ये एकदा तरी घेऊन जावं, असं भूपेन यांचं स्वप्न असतं. मात्र नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने हे स्वप्न अधुरंच राहतं. वाढदिवशीच भूपेन त्यांच्या मित्रांसमोर पुन्हा एकदा हिमालयच्या बेस कँपमध्ये जाण्याचा उल्लेख करतात. तेव्हासुद्धा हा प्लॅन फक्त प्लॅनच राहून जातो. दुसऱ्याच दिवशी कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन होतं. जगाचा निरोप घेण्याआधी ते त्यांच्या मित्रांसाठी अधुरं स्वप्न सोडून जातात.
#Unchai After a long time i watched such refreshingly different and breathtakingly beautiful movie. Kudos to @SrBachchan @AnupamPKher @bomanirani @Neenagupta001 and @SoorajBarjatya ji @rajshri #AmitabhBachchan pic.twitter.com/2Q3bJZWbmb
— Arvind Vishwakarma ?? (@ArvindVishwak10) November 11, 2022
भूपेन यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अस्थींचं विसर्जन एव्हरेस्ट पर्वतावर करण्याचा निर्णय तिघं मित्र घेतात. इथूनच मूळ कथेचा सुंदर प्रवास सुरू होतो. याच प्रवासात त्यांची भेट माला (सारिका) यांच्याशी होते. हे मित्र त्यांच्या प्रवासात यशस्वी होतात की नाही, त्यात त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची कथा पुढे पहायला मिळते.
बऱ्याच काळानंतर सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत त्यांनी बरेच हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची एक वेगळी शैली प्रेक्षकांना चांगलीच ठाऊक आहे. मात्र ‘उंचाई’द्वारे त्यांच्या दिग्दर्शनाचा एक वेगळा पैलू पहायला मिळतो. यात खासकरून त्यांनी राजश्री प्रॉडक्शनचा अंदाज बाजूला ठेवला आणि वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला.
Watched Unchai – A great movie after so many year. You can feel real human emotions played out naturally by classic actors without drama.
Everest represents the toughest challenge symbolically to scale.
Message – no age is too old to start and scale your own Everest!#Unchai— Saurabh Gupta (@GuptaIfs) November 14, 2022
चौथ्या मित्राचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या तीन मित्रांचा केवळ प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळत नाही, तर तो जगायलाही मिळतो. या प्रवासात लखनौचे खास समोसे आणि त्यासोबत मिळणारी तळलेली मिर्ची, कानपूरची ईमरती आणि मिठाई यांचा स्वाद प्रेक्षकांचं मन तृप्त करतो. मध्यांतरापर्यंत दिल्ली ते गोरखपूरपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तर मध्यांतरानंतर काठमांडूपासून एव्हरेस्टच्या बेस कँपपर्यंतचा प्रवास पहायला मिळतो.
या संपूर्ण प्रवासातील कोणताच क्षण विनाकारण दाखवला गेलाय, अशी भावना मनात येत नाही. संपूर्ण वेळ हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो. यातील प्रत्येक भूमिका आपल्यासोबत एक कथा घेऊन पुढे जात असते. त्यांची मैत्री कधी चेहऱ्यावर हसू तर कधी डोळ्यात पाणी आणते. नात्यांचं महत्त्व, मैत्रीचं सेलिब्रेशन, प्रवास यांसह इतर बऱ्याच गोष्टींतून एक चांगली शिकवण देण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो.
This movie is special .Must watch .
One of the best movie of Bollywood #Unchai pic.twitter.com/HHGLOU8npB
— Sachin (@sachinsanafan) November 13, 2022
रोड ट्रिपदरम्यान दिसणारे नयनरम्य दृश्य मनाला वेगळीच शांती देतात. चित्रपटाची लांबी अधिक असली तरी कथा कुठेच कंटाळवाणी किंवा रटाळ वाटत नाही. दमदार स्क्रीनप्ले आणि कलाकारांचं अभिनय हे कथेत हातात हात घालून पुढे जातात. यातील गाणीसुद्धा भावनिकदृष्ट्या कनेक्ट होणारी आहेत.
कलाकारांची खास निवड ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी, सारिका, नीना गुप्ता, परिणिती चोप्रा यापैकी कोणीच निराशा करत नाही. चार मित्र आणि प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे.
नात्यांचं महत्त्व, मैत्रीतील समर्पण, जीवनातील काही महत्त्वपूर्ण शिकवणी समजून घ्यायच्या असतील तर एकदा तरी हा चित्रपट पहावा. जवळपास तीन तासांचा हा चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाण्याची तीव्र भावना थिएटरमधून बाहेर पडताना जाणवते.