Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

| Updated on: Sep 30, 2024 | 11:00 AM

Mithun Chakraborty: बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मिथुन दा यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये कमालीची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
Follow us on

Mithun Chakraborty: बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिथुन दा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, दादासाहेब फाळके निवड ज्युरीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सध्या वैष्णव यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

8 ऑक्टोबर रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन दा यांना प्रदान करण्यात येणार आहे. असं देखील अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी फक्त अभिनयात नाही तर, ऍक्शन आणि डान्समध्ये देखील माहिर आहेत. शिवाय त्यांनी वेग-वेगळ्या भाषांच्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मिथुन दा यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी भाषेत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर मिथुन चक्रवती यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘दो अंजाने’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मिथुन दा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘तेरे प्यार में’, ‘प्रेम विवाह’, ‘हम पांच’, ‘डिस्को डान्सर’, ‘हम से है जमाना’, ‘घर एक मंदिर’, ‘अग्निपथ’, ‘तितली’, ‘गोलमाल 3’, ‘खिलाडी 786’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.