मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रविचित्र फॅशन हे जणू समीकरणच आहे. उर्फीला सर्वसामान्य कपड्यांमध्ये पाहणं दुर्मिळच असतं. कधी साखळ्या तर कधी विविध वस्तूंपासून ती तिचे कपडे डिझाइन करते. त्यातही अंगप्रदर्शनामुळे उर्फी सर्वाधिक चर्चेत असते. सुरुवातीला उर्फीच्या फॅशनवरून मोठा वाद झाला होता. मात्र आता नेटकऱ्यांनाही तिला या विचित्र कपड्यांमध्येच पाहण्याची सवय झाली आहे. म्हणूनच जेव्हा उर्फी पूर्ण किंवा साध्या कपड्यांमध्ये समोर येते, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. नुकतंच तिने मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत ‘बिग बॉस’ फेम प्रतीक सेहजपालसुद्धा होता. मंदिराबाहेर दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. उर्फीचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फीने लाल रंगाचा गरारा ड्रेस परिधान केला आहे. मात्र उर्फी पूर्णच सर्वसामान्य कपड्यांमध्ये कधीच दिसणार नाही, हे नेटकऱ्यांनाही ठाऊक आहे. तिने डोळ्यांवर डिझाइनचा मास्क लावला होता. हा मास्क तिने चषम्यासारखा घातला होता. तिच्यासोबत असलेल्या प्रतीकने जीन्स आणि कुर्ता परिधान केला होता. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आहेत. ‘ही उर्फी असूच शकत नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘साध्या कपड्यांमध्ये ती खरंच चांगली दिसतेय’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं आहे. ‘उर्फी मनाने खूप चांगली आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर काहींनी तिच्यावर मंदिरात जाण्यावरूनही टीका केली आहे.
उर्फीने तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे फक्त नेटकऱ्यांचंच नाही तर सेलिब्रिटींचंही लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री करीना कपूरने उर्फीचं कौतुक केलं होतं. उर्फीच्या बोल्ड फॅशनबद्दल तुला काय वाटतं असा प्रश्न करीनाला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “फॅशन म्हणजे व्यक्त होणं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. माझ्या मते उर्फीमध्ये हाच आत्मविश्वास आहे आणि त्यात आत्मविश्वासाने ती कपडे घालते. मला ती खूपच कूल वाटते.”