मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हटके फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. याच फॅशनमुळे तिला गेल्या काही दिवसांपासून विरोधाला सामोरं जावं लागत आहे. उर्फीला बलात्कार आणि सार्वजनिकरित्या मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. याविरोधात आता तिने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत तिने मुंबई पोलिसांकडून सुरक्षेचीही मागणी केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राजकीय फायद्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा आरोप उर्फीने या तक्रारीत केला आहे.
उर्फीने तिच्या या तक्रारीत महिला आयोगाकडे मागणी केली की तिला सुरक्षा पुरविली जावी आणि मुंबई पोलिसांनी तिच्या तक्रारीकडे गांभीर्याने पहावं. उर्फीच्या तक्रारीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यासंदर्भात ट्विट केलं आहे. उर्फीच्या प्रकरणाकडे गांभीर्याने पहावं, असे लिखित आदेश महिला आयोगाने पोलिसांना दिल्याचंही यात स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,”मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023
चित्रा वाघ यांच्यानंतर करणी सेनेचे प्रमुख सुरजीत सिंह राठोड यांनीसुद्धा उर्फीला धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी उर्फीला अंगभर कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला आहे.
Cannot Thank @ChakankarSpeaks and @Maha_MahilaAyog enough for standing for what’s right . Even if you do not like my clothes , you cannot take law in your hands and publicly threaten to hit me or incite violence .
— Uorfi (@uorfi_) January 18, 2023
‘भारतीय राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा हक्क दिला आहे. पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा,’ अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.
महिला आयोगाने तक्रारीची दखल घेतल्यानंतर उर्फीने ट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत. ‘जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहिल्याबद्दल रुपाली चाकणकर आणि महिला आयोग यांचे जितके आभार मानावे तितके कमी. जरी तुम्हाला माझे कपडे आवडले नसले तरी तुम्ही कायदा तुमच्या हातात घेऊ शकत नाही आणि मला सार्वजनिकरित्या मारण्याची धमकी देऊ शकत नाही,’ असं तिने लिहिलं.