अभिनेत्री उर्फी जावेद म्हटलं की डोळ्यांसमोर चित्रविचित्र कपड्यांमधील तरुणीच येते. उर्फी तिच्या अजबगजब फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. घरातल्या विविध वस्तूंपासून, वर्तमानपत्रापासून, साखड्या, दोरखंड यांसारख्या वस्तूंपासूनही तिने कपडे डिझाइन केले आहेत. मात्र अनेकदा अंगप्रदर्शन केल्याने तिच्यावर सतत टीका झाली आहे. मात्र पहिल्यांदाच असं घडलंय की उर्फीने नेटकऱ्यांना तिचं कौतुक करायला भाग पाडलं आहे. होय.. हे खरंच घडलंय. उर्फीचा नवा लूक पाहिल्यानंतर नेटकरीही थक्क झाले आहेत. त्यांनी तिच्या या लूकचं आणि फॅशन सेन्सचं प्रचंड कौतुक केलं आहे. इतकंच काय तर काहींनी तिची तुलना थेट बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्याशी केली आहे.
उर्फी तिच्या नव्या लूकमध्ये जेव्हा पापाराझींसमोर आली, तेव्हा सर्वजण चकीत झाले होते. तिने काळ्या रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता आणि त्यावर पाना-फुलांची डिझाइन होती. सुरुवातीला अगदी सर्वसामान्य दिसणाऱ्या या ड्रेसची खरी जादू जेव्हा उर्फीने सर्वांना दाखवली, तेव्हा सर्वजण बघतच राहिले. फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी पापाराझी जेव्हा तयार झाले, तेव्हा उर्फीने त्यांना सांगितलं की, ती एक जादू दाखवणार आहे. तिने टाळ्या वाजवण्यास सुरूवात करताच तिच्या ड्रेसवरील पाना-फुलांच्या डिझाइनमधून कागदी फुलपाखरू उडून खाली पडले. त्यानंतर पुन्हा ती पानं आणि फुलं पूर्ववत झाली. उर्फीची ही जादुई ड्रेस सर्वांनाच खूप आवडली.
उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘काही म्हणा, पण ही मुलगी मेहनत खूप करते’, असं एकाने लिहिलं. तर ‘पहिल्यांदा उर्फीने खूप सुंदर ड्रेस परिधान केला आहे आणि पहिल्यांदाच ती स्वत:सुद्धा सुंदर दिसतेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘जेव्हा इंजीनिअर आणि फॅशन डिझाइनर यांची भेट होते..’, अशीही कमेंट एका युजरने केली आहे. ‘अनेकदा टीका-टिप्पणी होत असतानाही ती थांबली नाही, तिने तिची कल्पकता आणखी चांगल्याप्रकारे सर्वांसमोर मांडली’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी उर्फीचं कौतुक केलं आहे.