मुंबई : राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’ या चित्रपटाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण केली. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि गाणी आजही प्रेक्षकांना लक्षात आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नुकतेच तिने काही ट्विट्स केले. या ट्विट्सच्या माध्यमातून उर्मिलाने ‘सत्या’मधील कामगिरीसाठी कोणताच पुरस्कार किंवा नामांकन मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली. ‘सत्या’मध्ये तिने चाळीतल्या साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. करिअरच्या त्या काळात उर्मिला तिच्या ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जात होती. रंगीला, जुदाई यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांपेक्षा ‘सत्या’मधील तिची भूमिका खूप वेगळी होती.
उर्मिलाने ट्विट करत इंडस्ट्रीतील पक्षपातीपणा आणि घराणेशाहीवर निशाणा साधला. मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने आणि पुरस्कार संस्थांनी ‘सत्या’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाकडे दुर्लक्ष केल्याची खंत तिने व्यक्त केली. ‘आकर्षक ग्लॅमरस करिअरच्या शिखरावर असताना 25 वर्षे पूर्ण झालेल्या ‘सत्या’ चित्रपटात साध्याभोळ्या चाळीतल्या विद्या या मुलीची भूमिका साकारली. पण नाही, त्याचा अभिनयासाठी काय संबंध? त्यामुळे कोणतेच पुरस्कार नाहीत आणि नामांकनदेखील नाही. तेव्हा बसा आणि माझ्याशी पक्षपातीपणा आणि घराणेशाहीबद्दल बोलू नका’, असं तिने लिहिलं.
25yrs of Satya n of playing simple naive chawl girl Vidya at the peak of an scintillating glamorous career. But NO what did that have to do with “acting”.. so no awards n not even nominations. So sit down n don’t talk to me about favouritism n nepotism..#jastsaying pic.twitter.com/xIcRkHoE8l
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) July 3, 2023
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं की ‘सत्या’ चित्रपटातील उर्मिला मातोंडकरचे कपडे हे इतर कलाकारांच्या कपड्यांपेक्षा दहा पटीने जास्त महाग होते. “मला प्रत्येकाच्या पोशाखाची किंमत माहीत नाही, पण हे नक्की आहे की उर्मिलाचे कपडे इतरांपेक्षा दहा पटीने महाग होते”, असं ते म्हणाले. सत्या या चित्रपटात उर्मिलासोबतच जेडी चक्रवर्ती, सौरभ शुक्ला, मनोज बाजपेयी, शेफाली शाह यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने इंडस्ट्रीतील इतर चित्रपटांचं समीकरणच पूर्णपणे बदललं होतं. गँगस्टरची कथा पडद्यावर सांगण्यात आल्याने या चित्रपटाला एक वेगळीच ओळख मिळाली होती.
उर्मिलाने 3 मार्च 2016 रोजी मोहसिन अख्तरशी लग्नगाठ बांधली. तिने रंगीला, जुदाई, सत्या, कौन, खुबसुरत, जंगल, प्यार तुने क्या किया, पिंजर, भूत, एक हसीना थी, मैने गांधी को नहीं मारा, बस एक पल, ब्लॅकमेल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.