बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. घटस्फोटासाठी कोर्टात याचिका देखील दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. घटस्फोटामुळे चर्चेत आल्याने अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उर्मिला रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केली होती.
उर्मिला मातोंडकर हिने अनेक सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. वयाच्या 3 ऱ्या वर्षी उर्मिला हिने बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली. 1991 मध्ये उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1995 मध्ये उर्मिला राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला सिनेमात दिसली. रंगीला हा त्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरला होता. सिनेमामुळे उर्मिला रातोरात स्टार बनली.
अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर, 2003 नंतर उर्मिलाचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ लागले. 2008 मध्ये उर्मिला karzzzz सिनेमामध्ये दिसली होती. सिनेमात हिमेश रेशमिया, डिनो मोरिया, डॅनी डेन्झोंगपा हे देखील होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर उर्मिलाचं करिअर संपुष्टात आलं.
बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना उर्मिला हिने उद्योजक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केलं. दोघांमध्ये जवळपास 10 वर्षांचं अंतर आहे. 2016 मध्ये मोहसिन अख्तर मीर आणि उर्मिला यांनी लग्न केलं. दरम्यान, अभिनेत्री राजकारणात प्रवेश केला.
उर्मिला मातोंडकर हिने 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अभिनेत्रीने लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र ती हरली होती. 2020 मध्ये अभिनेत्रीने पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर उर्मिला हिने उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला.
सिनेमांमध्ये काम मिळत नसलं तरी, अभिनेत्री रॉयल आयुष्य जगते. मीडिया रिपोर्टनुसार, उर्मिला हिच्याकडे तब्बल 68 कोटी रुपयांची संपत्ती आहे. उर्मिलाकडे 1 कोटी 27 लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत. याशिवाय अभिनेत्रीकडे 1 लाख 48 हजार रुपयांचे सोन्याचे नाणे आहे.
उर्मिला हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. अभिनेत्रीकडे मर्सिडीजसह दोन अन्य गाड्या देखील आहेत. अभिनेत्रीच्या पतीकडे टाटा स्टॉर्म कार आहे. याशिवाय त्याच्याकडे रॉयल एनफिल्ड डेझर्ट स्टॉर्म देखील आहे.