नव्वदच्या दशकात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने बॉलिवूड अक्षरश: गाजवलं होतं. विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत उर्मिताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. उर्मिलाच्या चित्रपटांविषयी तर अनेकांना माहीत असेलच, पण तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं कोणाला माहीत नाही. उर्मिला तिच्या लग्नाविषयी, खासगी आयुष्याविषयी फारशी कधी मोकळेपणे व्यक्त झाली नाही. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिला आणि तिचा पती मोहसिन अख्तर मीर हे घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय. करिअरच्या शिखरावर असताना उर्मिलाचं नाव अनेकदा दिग्दर्शक राम गोपाल वर्माशी जोडलं गेलं होतं. मात्र प्रत्यक्षात उर्मिला तिच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान काश्मिरी व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. या दोघांनी त्यांचं रिलेशनशिप माध्यमांपासून बराच काळ यशस्वीरित्या लपवलं होतं.
उर्मिलाचा पती मोहसिन हा काश्मिरी बिझनेसमन, अभिनेता आणि मॉडेलसुद्धा आहे. 2007 मध्ये ‘मिस्टर इंडिया’च्या स्पर्धेत त्याने तिसरं स्थान पटकावलं होतं. तर 2009 मध्ये तो ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातही झळकला होता. मुंबईत मॉडेलिंगमध्ये करिअर करताना मोहसिनला बराच संघर्ष करावा लागला होता. त्याचवेळी त्याची भेट उर्मिलाशी झाली होती. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राची भाची रिधी मल्होत्राच्या लग्नात 2014 मध्ये उर्मिला आणि मोहसिनची पहिली भेट झाली होती. त्यानंतर या दोघांना एकत्र आणण्यात मनिष मल्होत्राने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं म्हटलं जातं. किंबहुना उर्मिलाला पाहताचक्षणी मोहसिन तिच्या प्रेमात पडला होता.
उर्मिलाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मोहसिनने तिच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. त्याने लग्नासाठी तिला प्रपोजसुद्धा केलं होतं, मात्र सुरुवातीला उर्मिला लग्नाबाबतच्या निर्णयावर ठाम नव्हती. तरीसुद्धा मोहसिन तिला भेटत होता आणि तिच्या चांगल्यावाईट काळात त्याने तिची साथ दिली. अखेर उर्मिलाने एकेदिवशी त्याच्या प्रपोजलला होकार दिला. 3 मार्च 2016 रोजी मुंबईत उर्मिलाच्या घरीच दोघांनी अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. फिल्म इंडस्ट्रीतून फक्त मनिष मल्होत्रा या लग्नाला उपस्थित होता. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही पद्धतीनुसार उर्मिला-मोहसिनने लग्न केलं.
लग्नानंतर उर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारल्याची त्यावेळी खूप चर्चा होती. अखेर उर्मिलाने एका मुलाखतीत या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. “अशा पद्धतीचं राजकारण मला अजिबात आवडत नाही. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, मी धर्मांतर केलं तरी काय फरक पडतो? मी नेहमीच मला जे योग्य वाटतं ते ताठ मानाने केलंय. मी आज जी आहे, जिथे आहे त्याचा मला अभिमान आहे. मला लाज वाटेल अशी कोणतीच गोष्ट मी कधीच केली नाही. मी हिंदू आहे. याच धर्माचं मी पालन करते. जरी मी इस्लाम धर्म स्वीकारला असता तरी ते मी अभिमानाने सर्वांना सांगितलं असतं. पण माझ्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार कोणालाच नाही”, असं ती म्हणाली होती.