मुंबई- ‘कोमोलिका’ या भूमिकेमुळे अभिनेत्री उर्वशी ढोलकिया घराघरात पोहोचली. मालिकेतील या भूमिकेमुळे तिला खऱ्या आयुष्यातही ‘कोमोलिका’ हेच नाव मिळालं. 43 वर्षीय उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसोबत ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. उर्वशी सध्या तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतेच तिने स्विमिंग पूलमध्ये बिकिनी परिधान करत फोटोशूट केलं आहे. हे फोटो पोस्ट करत असतानाच तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
आपलं शरीर जसं असेल त्याच्याशी आपण कम्फर्टेबल राहिलं पाहिजे, असा सल्ला तिने महिलांना दिला आहे. वेळेनुसार महिलांच्या शरीरात बदल होत असतात आणि हे बदल आपण स्वीकारले पाहिजे, असं ती म्हणाली.
“महिलांच्या दिसण्याला खूप महत्त्व दिलं जातं, म्हणूनच त्या नेहमी चांगलं दिसण्याच्या दबावाखाली असतात. मी दोन तरुण मुलांची आई आहे असं बोलून मला नेहमीच कॅटगराइज केलं जातं. मी काहीही पोस्ट केलं किंवा लिहिलं तरी दोन मुलांची आई हे सर्व करतेय, असं म्हटलं जातं. मात्र असं का? मी माणूस नाहीये का. तू दोन मुलांचा बाप आहेस, असं पुरुषाला कधीच म्हटलं जात नाही,” असं उर्वशी म्हणाली.
“आपल्या देशात आजही लोकांना वाटतं की वयाची चाळीशी ओलांडलेल्या महिलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही. तुमची निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता का? असं कधीच कोणासोबत घडलं नाही पाहिजे. लोक थिएटरमध्ये जाऊन महिलांना बिकिनीमध्ये पाहू शकतात, पण बिकिनीमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला तर त्यावरून ट्रोलिंग सुरू होते”, अशा शब्दांत उर्वशीने राग व्यक्त केला.
“बिकिनी असो वा सलवार-कुर्ता, लोक कमेंट्स करणं सोडत नाहीत. जेव्हा एखादा पुरुष शर्ट काढून फोटो पोस्ट करतो, तेव्हा कोणालाच आक्षेप नसतो. वाईट काळात समाज माझ्या पाठिशी उभा राहत नाही, माझी बिलं ते भरत नाहीत, त्यामुळे माझ्या इच्छेनुसार मी वागणार,” असं उर्वशी एका मुलाखतीत म्हणाली.