मुंबई- एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्या गैरहजेरीत तुमच्या रुममध्ये शिरून सामानाचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला तर तुम्हाला कसं वाटेल? हीच गोष्ट क्रिकेटर विराट कोहलीसोबत घडली आहे. यामुळे सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. विराटच्या हॉटेल रूम लीकबाबत आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने संताप व्यक्त केला आहे.
विराट सध्या टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मात्र त्याच्या गैरहजेरीत कोणीतरी विराटच्या हॉटेल रुममध्ये शिरून आतील व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक करण्यात आला आहे. या घटनेबाबत विराट आणि अनुष्का शर्माने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
उर्वशीने विराटची पोस्ट शेअर करत या घटनेला लज्जास्पद म्हटलं आहे. हेच जर एखाद्या मुलीसोबत घडलं असतं तर काय केलं असतं, असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. ‘ही अत्यंत वाईट आणि निर्लज्जपणाची बाब आहे. जर हेच एखाद्या मुलीसोबत घडलं असतं तर’, असा सवाल उर्वशीने केला.
‘काही घटना याआधीही अनुभवल्या आहेत, ज्यामध्ये काही चाहत्यांनी कोणतीही दया किंवा विनम्रता दाखवली नाही. परंतु ही खरोखर सर्वांत वाईट गोष्ट आहे. हे एका व्यक्तीच्या खासगी आयुष्याचा अपमान आणि त्याच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. हे पाहून जर कोणी असा विचार करत असेल की सेलिब्रिटी आहे तर या गोष्टींचा सामना करावा लागेल, तर तुम्हीदेखील या समस्येचा एक भाग आहात. काही प्रमाणात आत्मनियंत्रण प्रत्येकाने करावं. तसंच जर हे तुमच्या बेडरुममध्ये होत असेल तर मर्यादेची सीमा कुठे आहे?’, असा सवाल अनुष्काने उपस्थित केला आहे.