अभिनेता वरुण धवन अनेकदा त्याच्या सहअभिनेत्रींसोबत वागताना मर्यादांचं उल्लंघन करतो, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली. वरुणचे काही व्हिडीओ याआधी सोशल मीडियावर चर्चेत होते. ज्यामध्ये तो अभिनेत्री कियारा अडवाणीच्या गालावर तिच्या परवानगीशिवाय किस करताना, एका लाइव्ह इव्हेंटमध्ये अभिनेत्री आलिया भट्टच्या कमरेला स्पर्श करताना दिसत आहे. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत वरुणवर टीका केली होती. अभिनेत्रींसोबतचं वरुणचं वर्तन योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. त्यावर आता खुद्द वरुणने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता.
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये वरुण म्हणाला, “छेडम-छाडी किंवा मजामस्करी जर चांगल्या हेतूने आणि योग्य चौकटीत राहून केली, मग ते पुरुष असो किंवा महिला.. तर त्यात काही मला आक्षेपार्ह वाटत नाही. मी माझ्या सहअभिनेत्यांसोबतही बरीच मजामस्ती करतो, पण कधीच याबद्दल कोणी काही चुकीचं बोलत नाही.” यावेळी वरुणला कियारासोबतच्या किसिंग सीनबद्दल विचारल्यावर त्याने सांगितलं, “बरं झालं, तुम्ही हा प्रश्न विचारलात. तो किस आम्ही आधीच प्लॅन केला होता. कियारा आणि मी.. आम्ही दोघांनी तो क्लिप पोस्ट केला होता. एका डिजिटलसाठी आम्ही तो व्हिडीओ शूट केला होता आणि त्यांना तशा पद्धतीचं काहीतरी हवं होतं. म्हणून आम्ही दोघांनी ते आधीच ठरवलं होतं. कियारा ही खूप चांगली अभिनेत्री आहे. म्हणूनच त्या व्हिडीओत तिने तशी प्रतिक्रिया दिली आहे. पण तो किसिंग सीन आधीच प्लॅन केलेला होता.”
‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात वरुण कियाराच्या कमरेला धरून तिला स्विमिंग पूलमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो तिला पूलमध्ये ढकलत नाही, तर फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर कियारा वैतागून त्याला म्हणते, “थांबव हे.” या घटनेविषयी वरुण म्हणतो, “ती गोष्ट आधीच प्लॅन केलेली नव्हती. मी ते मुद्दामच केलं होतं. पण ती सर्व मस्करीच होती. माझा स्वभावच असा मस्तीखोर आहे.”
तिसऱ्या एका घटनेत वरुण लाइव्ह इव्हेंटमध्ये आलियाच्या कमरेला स्पर्श करतो. याबद्दलही वरुणला स्पष्टीकरण विचारलं जातं. “मी ते मस्करीत केलं होतं. त्याला फ्लर्टिंग म्हणता येणार नाही. आम्ही चांगले मित्र आहोत”, असं त्याने सांगितलं. वरुण आणि आलियाने ‘स्टुडंट ऑफ इ इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दोघांनी ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’, ‘हंप्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘कलंक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.