वरुण धवनच्या घरात घुसली प्रभावशाली व्यक्तीची पत्नी; अखेर पोलिसांना केलं पाचारण

| Updated on: Dec 22, 2024 | 8:21 AM

अभिनेता वरुण धवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीची पत्नी वरुण धवनच्या घरात अचानक घुसली होती. अखेर वरुणला पोलिसांना बोलवावं लागलं होतं.

वरुण धवनच्या घरात घुसली प्रभावशाली व्यक्तीची पत्नी; अखेर पोलिसांना केलं पाचारण
Varun Dhawan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘बेबी जॉन’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. याच प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत वरुणने त्याच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला. वरुणने सांगितलं की एका चाहतीने त्याला सतत स्टॉक केलं होतं. इतकंच नव्हे तर ती त्याच्या घरीसुद्धा पोहोचली होती. अखेर वरुणला पोलिसांना फोन करावा लागला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पाठलाग करणारी ती चाहती एका पॉवरफुल व्यक्तीची पत्नी होती, असं वरुण म्हणाला.

रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वरुण म्हणाला, “एके दिवशी अचानक एक महिला माझ्या घरात माझ्या परवानगीशिवाय घुसली होती. ती मला एका अत्यंत पॉवरफुल व्यक्तीची पत्नी होती. मी त्या व्यक्तीचं स्थान सांगू शकत नाही.. पण ती व्यक्ती खूप प्रभावशाली होती. त्या महिलेची कोणीतरी माझ्या नावाने फसवणूक करत होतं. माझं नाव वापरून कोणीतरी तिच्याशी बोलत होतं. ते सर्व खूपच भीतीदायक होतं. मला अखेर पोलिसांना फोन करावा लागला.”

हे सुद्धा वाचा

“मी अशाही लोकांना भेटलोय जे त्यांच्या घरातून पळून आले होते, तीन-चार दिवस समुद्रकिनारी राहिले होते. अशा वेळी मला पोलिसांना फोन करावा लागतो. एका चाहतीने मला बळजबरी किस केलं होतं, जे मला अजिबात आवडलं नव्हतं. मला माझ्या प्रायव्हसीचं उल्लंघन केल्यासारखं वाटलं होतं. इतकंच काय तर काहींनी नको त्या ठिकाणीही स्पर्श केला. जर माझ्यासोबत असं काही होऊ शकतं, तर महिलांना याहून किती वाईट घटनांचा सामना करावा लागेल असा विचार माझ्या मनात येतो. माझ्यासोबत असं होत असेल तर त्यांच्यासोबत आणखी वाईट होत असेल”, असं वरुण पुढे म्हणाला.

वरुण धवन हा निर्माते आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. त्याने ‘स्टुडंट्स ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी त्याने करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 2012 ते 2018 दरम्यान वरुणने 11 हिट चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मैं तेरा हिरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’, ‘दिलवाले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्याने नताशा दलालशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.