मुंबई : बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा हे पुरस्कार विकले गेल्याची टीका मोठ्या कलाकारांकडून होते. तर काही कलाकार असेही आहेत जे कधीच कोणत्या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावत नाहीत. आता नुकत्याच एका दिग्गज अभिनेत्याने बॉलिवूडच्या फिल्मफेअर पुरस्काराबद्दल खुलासा केला आहे. आपल्या कारकीर्दीत मिळालेल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा वापर त्यांनी चक्क वॉशरूमचा हॅण्डल म्हणून केला आहे. अशा पुरस्कारांचं काहीच महत्त्व नसल्याचं त्यांनी म्हटलंय. हे दिग्गज कलाकार नसीरुद्दीन शाह आहेत.
नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांना त्यांच्या कारकीर्दीत बरेच पुरस्कार मिळाले. मात्र त्या पुरस्कारांना ते गांभीर्याने घेत नाहीत. या पुरस्कारांमध्ये पक्षपात असतो, म्हणूनच असे पुरस्कार जिंकल्यानंतरही त्यांना फारसं महत्त्व देत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“मला असे ट्रॉफी महत्वाचे वाटत नाहीत. सुरुवातीला जेव्हा मला पुरस्कार मिळायचे तेव्हा मी खुश होतो. पण नंतर अशा पुरस्कारांचा खच पडू लागला. हे पुरस्कार म्हणजे एका लॉबीचा भाग असल्याचं मला समजलं होतं. एखाद्याला हा पुरस्कार त्याच्या कामासाठीच मिळेल असं नाही. त्यामुळे मी पुरस्कार स्वीकारणं बंद केलं. जेव्हा मला पद्मश्री आणि पद्मभूषण सारखे सन्मान मिळाले, तेव्हा मला माझ्या दिवंगत वडिलांची आठवण झाली. त्यांना नेहमी माझ्या नोकरीची चिंता असायची. जर तू हे फालतू काम केलंस तर तू मूर्ख ठरशील, असं ते मला म्हणायचे. त्यामुळे जेव्हा मी हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये गेलो तेव्हा मनातल्या मनात मी वडिलांना म्हटलं की तुम्ही बघताय ना? त्यांनी नक्कीच मला पाहिलं असेल आणि त्यांना आनंदही झाला असेल. असे पुरस्कार मिळाल्यानंतर मीसुद्धा खुश होतो. पण मला इतर स्पर्धात्मक पुरस्कारांमध्ये काही रस नाही,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.
मिळालेल्या फिल्मफेअर ट्रॉफीचं काय केलं याविषयी सांगताना ते पुढे म्हणाले, “जो अभिनेता एखाद्या भूमिकेत आपला संपूर्ण जीव ओततो तो चांगला अभिनेता असतो. तुम्ही तर अनेक कलाकारांमधून एकाला निवडून म्हणालात की हा सर्वोत्तम आहे तर ते योग्य कसं असेल? मला अशा पुरस्कारांचा अभिमान नाही. मला मिळालेले शेवटचे दोन पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी गेलोसुद्धा नाही. मी जेव्हा फार्महाऊस बांधला, तेव्हा तिथे हे मिळालेले पुरस्कार ठेवण्याचा विचार केला. जो कोणी वॉशरूम जाईल, त्याला दोन पुरस्कार मिळतील, कारण दोन्ही हँडल हे फिल्मफेअर ट्रॉफीपासून बनवले आहेत.”