ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी नाशिकमध्ये राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 3 जुलै रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. स्मृती बिस्वास यांनी बंगाली, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम केलं होतं. निर्माते-दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. ‘स्मृतीजी तुमच्या आत्म्याला शांती लाभो. याहून आनंदी ठिकाणी जा. तुम्ही आमचं आयुष्य समृद्ध केलंत त्याबद्दल धन्यवाद’, अशा शब्दांत मेहता यांनी श्रद्धांजली वाहिली. स्मृती बिस्वास या 100 वर्षांच्या होत्या.
स्मृती या नाशिक रोड परिसरातील वन-रुम किचनमध्ये भाड्याने राहत होत्या. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. गुरू दत्त, व्ही. शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बीआर चोप्रा आणि राज कपूर यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. स्मृती यांनी त्यांच्या करिअरमध्ये देवानंद, किशोर कुमार आणि बलराज साहनी यांसारख्या नामांकित कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केला.
स्मृती यांनी 1930 मध्ये ‘संध्या’ या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं. तर 1960 मध्ये त्या ‘मॉडेल गर्ल’ या चित्रपटात शेवटच्या झळकल्या होत्या. दिग्दर्शक एसडी नारंग यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला होता. तर पतीच्या निधनानंतर त्या नाशिकला राहायला गेल्या होत्या. यावर्षी 17 फेब्रुवारी रोजी त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या पश्चात राजीव आणि सत्यजीत ही दोन मुलं आहेत.