प्रसिद्ध बंगाली गायिका (Bengali singer) निर्मला मिश्रा (Nirmala Mishra) यांचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. दक्षिण कोलकाता इथल्या चेतला परिसरातील त्यांच्या राहत्या घरी निर्मला यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मला यांनी अनेक बंगाली आणि ओडिया चित्रपटांमधील गाणी गायल्या होत्या. वृद्धापकाळातील आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 12.05 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने जवळच्या नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. परंतु नर्सिंग होममध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी निर्मला यांना मृत घोषित केलं. निर्मला यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी रविवारी सकाळी 11 च्या सुमारास रवींद्र सदन याठिकाणी नेण्यात आलं. बंगाली कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्मला मिश्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात 1938 मध्ये जन्मलेल्या निर्मला यांना संगीत सुधाकर बाळकृष्ण दास पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. उडिया संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
निर्मला मिश्रा यांच्या लोकप्रिय बंगाली गाण्यांमध्ये ‘इमोन एकता झिनुक’, ‘बोलो तो अर्शी’ आणि ‘ई बांग्लार माटी चाय’ यांचा समावेश आहे. तर ‘निदा भरा राती मधु झारा जान्हा’ आणि ‘मो मन बिना रा तारे’ ही त्यांची ओडिया भाषेतील गाणी प्रसिद्ध आहेत.