मुंबई : 24 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. (आज) शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. सकाळी बऱ्याच वेळापर्यंत ते बाथरुममधून बाहेर आले नाहीत, म्हणून कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. अखेर बाथरुमचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास राजकुमार कोहली अंघोळीसाठी गेले होते.
अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेले वडील बराच वेळ बाहेर न आल्याने मुलगा अरमान कोहलीने आवाज दिला. आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. अखेरचा पर्याय म्हणून अरमानने बाथरुमचा दरवाजा तोडला आणि वडिलांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मुंबईतील जुहू परिसरातील राहत्या घरात ही घटना घडली. राजकुमार कोहली यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
राजकुमार कोहली यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘नागिन’, ‘जानी दुश्मन’, ‘बीवी नौकर का’, ‘बदले की आग’, ‘राज तिलक’, ‘जीने नहीं दूंगा’, ‘इंतेकाम’, ‘बीस साल बाद’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. त्यापैकी ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ हे त्यांचे सर्वाधिक हिट चित्रपट आहेत. राजकुमार यांनी 1962 मध्ये ‘सपनी’ या नावाचा चित्रपट बनवला होता. यामध्ये प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
राजकुमार कोहली दिग्दर्शित ‘जानी दुश्मन’ हा चित्रपट मल्टिस्टारर होता. यामध्ये अक्षय कुमार, सनी देओल, सुनील शेट्टी, सोनू निगम, अरमान कोहली यांनी काम केलं होतं. 2002 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजकुमार यांनी मुलगा अरमान कोहलीला 1992 मध्ये ‘विरोधी’ नावाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. मात्र बॉलिवूडमध्ये अरमानला फारसं यश मिळालं नाही. अरमानने सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती.