मुंबई- ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. या टीझरमधील कलाकारांचा लूक आणि VFX यावरून नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. इतकंच नव्हे तर आदिपुरुष या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी करण्यात आली. त्यानंतर अखेर निर्मात्यांनी काही वेळ घेत चित्रपटात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. याचसाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यादरम्यान एका व्हीएफएक्स आर्टिस्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
एका VFX आर्टिस्टने आदिपुरुष टीझरमधील सैफ अली खानचा एक सीन पाहिल्यानंतर स्वत:ची युक्ती वापरून ‘ड्रॅगन सीन’ तयार केला आहे. हा सीन कसा तयार करण्यात आला आणि नंतर VFX मध्ये तो कसा दिसतो, याची झलक या काही सेकंदांच्या व्हिडीओत पहायला मिळतोय.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘तुलाच 500 कोटी रुपये दिले पाहिजेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू जे काही केलंस, ते आदिपुरुषपेक्षा खूप चांगलं आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘मार्व्हल स्टुडिओ- सॅलरी पॅकेजवर चर्चा करूयात का?’, अशी मजेशीर कमेंटही एकाने केली.
हे करण्यासाठी किती वेळ लागला असं एकाने विचारलं असता त्यावर संबंधित VFX आर्टिस्टने उत्तर दिलं, ‘100 सॅम्पल्सचा वापर करून एका रात्रीत हे रेंडर केलंय.’ यावरून ‘आदिपुरुषने सुद्धा एका रात्रीत संपूर्ण चित्रपट बनवला असेल’, अशी खिल्ली दुसऱ्या युजरने उडवली.
आदिपुरुष या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. जेव्हा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातील सैफचा लूक पाहून अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. सैफ अली खानच्या दाढी आणि मिशीवरून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आता हाच लूक व्हिएफएक्सच्या मदतीने हटवला जाणार असल्याचं समजतंय.