मुंबई : 10 डिसेंबर 2023 | बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या चित्रपटांमधील ॲक्शन सीन्समुळे चर्चेत असतो. मात्र सध्या विद्युत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. विद्युतचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंगच्या संगतीचा परिणाम झालाय का, असाही सवाल काहींनी केला आहे. यामागचं कारण म्हणजे विद्युतने सोशल मीडियावर न्यूड फोटो पोस्ट केले आहेत. जंगलातील हे न्यूड फोटो पोस्ट करत त्यासोबतच त्याने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
विद्युतच्या या फोटोंवर अवघ्या एका तासात पाच लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी त्याच्या या फोटोंवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भारताच्या टार्झनसाठी आता आपल्याला स्टार भेटला आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हा भाऊ स्वत:ला बेअर ग्रिल्स समजतोय का’, असा उपरोधिक सवाल दुसऱ्याने केला. ‘सर तुम्हाला विनंती करतो की कृपया हे फोटो डिलिट करा’, असंही एका युजरने म्हटलंय. विद्युतने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तो जंगलात विवस्त्र असल्याचं पहायला मिळत आहे. एका फोटोमध्ये तो नदीच्या किनारी बसला आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो जंगलात जेवण बनवताना दिसतोय.
विद्युत जामवालचा आज 43 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 10 डिसेंबर 1980 रोजी जम्मूमधील एका राजपूत कुटुंबात झाला. विद्युतचे वडील सैन्यात होते, ज्यामुळे त्याला विविध शहरांत राहून आपलं शिक्षण पूर्ण करावं लागलं. इतकंच नव्हे तर विद्युतने तीन वर्षांचा असतानाच केरळमधील पलक्कड आश्रममध्ये कलारिपयट्टूचं शिक्षण घेतलं होतं. याशिवाय त्याने मार्शल आर्ट्समध्येही प्रभुत्व मिळवलंय.
विद्युतने 25 पेक्षा जास्त देशांमध्ये जाऊन लाइव्ह ॲक्शन शोज केले आहेत. इतकंच नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीत एण्ट्री केल्यानंतरही तो त्याचे ॲक्शन सीन्स स्वत:च करू लागला. विदुयतने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शक्ती’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘फोर्स’ चित्रपटातील विद्युत आणि जॉन अब्राहमच्या ॲक्शन सीन्सचं फार कौतुक झालं होतं.