नवी दिल्ली: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने यावर्षी ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र याच चित्रपटामुळे तो सध्या अडचणीत सापडला आहे. ‘लायगर’ चित्रपटाच्या फंडिंगवरून विजयला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले. याआधी दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्माती चार्मी कौर यांचीही याप्रकरणी चौकशी झाली. चित्रपटाला निधी देण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा हा 1999 च्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्टचं (FEMA) उल्लंघन करून परदेशातून आल्याचा आरोप आहे. या गुंतवणूकदारांची ओळख जाणून घेण्यासाठी विजयला ईडीने समन्स बजावले.
ईडीच्या चौकशीनंतर विजयने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “लोकप्रियतेसोबत आव्हानंसुद्धा तुमच्या वाट्याला येतात आणि त्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही. पण या घटनेकडे मी एक अनुभव म्हणून पाहतो. त्यांनी बोलावल्यानंतर मी माझं जे कर्तव्य होतं ते पार पाडलं. मी तिथे गेलो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली”, असं विजय म्हणाला.
ईडीने तब्बल 12 तास चौकशी केल्याच्या वृत्ताला विजयने दुजोरा दिला. दोन आठवड्यांपूर्वी लायगर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माती यांचीसुद्धा जवळपास 12 तास चौकशी झाली होती. “चित्रपटाचं फंडींग कोणत्या कंपनीने किंवा व्यक्तीने केलं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. चित्रपटात गुंतवलेला पैसा हा परदेशातून आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ‘फेमा’चं उल्लंघन झालंय का याचा तपास ते करत आहेत”, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लायगर या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे, रम्या कृष्णन आणि रोनित रॉय यांच्याही भूमिका आहेत. संपूर्ण देशभरात या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन झालं होतं. करण जोहरने या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन प्रदर्शित केलं. अनन्या आणि विजयने देशातील विविध राज्यांमध्ये फिरत या चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही.