मुंबई : 16 जानेवारी 2024 | दिग्दर्शक विक्रम भट्ट हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. पूर्व पत्नी अदिती भट्टसोबतचं नातं, सुष्मिता सेन आणि अमीषा पटेल यांच्यासोबतचं अफेअर यांविषयी त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. इतकंच नव्हे तर 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘आँखे’ या चित्रपटाची कथा थोडीफार सुष्मितासोबतच्या अफेअरवर आधारित असल्याचाही खुलासा त्यांनी केला. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “होय, तो चित्रपट माझ्या कथेवर थोडाफार आधारित होता. मी त्याला सेमी-फिक्शनल असं म्हणेन. सुष्मिता आणि माझ्या पत्नीसोबत जी परिस्थिती होती, त्याच्या भावना मी मांडण्याचा प्रयत्न केला. काल्पनिक कथेत मी खऱ्या भावना ओतण्याचा प्रयत्न केला.”
सुष्मितासोबतच्या अफेअरबाबत चित्रपट केल्याने पत्नी नाराज झाली होती का, असा प्रश्न विचारला असता विक्रम पुढे म्हणाले, “जर कोणाला दोष द्यायचा असेल तर मी स्वत:लाच देईन. मी सुष्मिता किंवा माझ्या पूर्व पत्नीच्या भूमिकेला दोष देणार नाही. सुष्मिताला वाईट वाटलं का, हे मी कधीच तिला विचारलं नाही. माझ्या आयुष्यावर माझं नियंत्रण असू शकतं, पण ते मी दुसऱ्यांच्या आयुष्यावर आणू शकत नाही. मी माझ्यासोबत जे घडलंय, तेच सांगू शकतो.”
सुष्मिता किंवा अमीषा पटेलसोबतच्या नात्याबद्दल बोलताना विक्रम भट्ट म्हणाले, “त्या दु:खाने मला बरंच काही शिकवलंय. त्या दु:खामुळेच आज मी याठिकाणी आहे. जर त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या नसत्या तर आज मी इथे नसतो. मला असं वाटतं की आपण जन्माच्या आधीपासूनच आपल्या शिक्षा निवडलेलो असतो आणि कदाचित मी या गोष्टी निवडल्या असेन. जे काही घडलं तो सर्वस्वी माझा निर्णय होता. मी ते घडू दिलं. माझ्या परवानगीशिवाय माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट घडली नाही.”
2000 च्या सुरुवातीला विक्रम भट्ट हे सुष्मिता सेन आणि अमीषा पटेल यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. सुष्मितासोबतच्या अफेअरमुळे विक्रम भट्ट यांचा पत्नी अदितीसोबत घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातं. सुष्मितासोबतच्या नात्याचा पश्चात्ताप होतो का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मला माझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा पश्चात्ताप नाही. मी खूप चुका केल्या आणि त्यातून शिकलो. कदाचित अजूनही बरंच काही शिकायचं बाकी असेल. पण हा संपूर्ण प्रवास फक्त माझ्या एकट्याचा आहे.”