मुंबई : 8 जानेवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या मालदीवच्या तीन उपमंत्र्यांवर रविवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट लिहिली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटींकडून त्याचा निषेध नोंदवला जात आहे. तर दुसरीकडे लक्षद्वीप आणि भारतीय पर्यटन स्थळांची जोरदार प्रसिद्धी केली जात आहे. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, जॉन अब्राहम यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिले आहेत. अशातच कॉमेडियन वीर दासच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वीर दासने अशा सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सची खिल्ली उडवली आहे, जे त्यांच्या मालदीव व्हेकेशन्सचे फोटो आता सोशल मीडियावर पोस्ट करू शकत नाहीयेत.
मालदीवमधील व्हेकेशनचे फोटो अत्यंत सुंदर येण्यासाठी बरेच सेलिब्रिटी फिगरकडे लक्ष देतात. व्हेकेशनच्या आधीपासूनच त्यांचे वर्कआऊट, डाएट असे सगळे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे एवढं सगळं केल्यानंतरही आता मालदीवच्या वादामुळे तिथल्या व्हेकेशनचे फोटो पोस्ट करण्यासाठी घाबरत असल्याचं वीर दासने म्हटलंय. ‘सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, लक्षद्वीपला इतकं प्रेम मिळत असल्याचं पाहून मला आनंद होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे, आता मालदीवमध्ये कुठेतरी एखादा भारतीय सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर असेल, ज्याने दोन आठवडे कार्ब्स (वजन वाढेल म्हणून) खाल्ले नसतील, व्हेकेशनचे सर्वोत्तम फोटो काढले असतील आणि आता ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी घाबरत असेल’, असं त्याने ट्विटरवर लिहिलंय.
Firstly, happy Lakshadweep is getting some love! Secondly, Somewhere in the Maldives, right now, is an Indian celebrity/influencer, who didn’t eat carbs for two weeks, took the best vacation photos ever, and is TERRIFIED to post them 🙂
— Vir Das (@thevirdas) January 8, 2024
वीर दासच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ते मालदीवचेच फोटो पोस्ट करून लक्षद्वीप असल्याचं सांगू शकतात. कारण दोन्ही ठिकाणं एकसारखीच दिसतात. यामुळे उलट त्यांना अधिक प्रसिद्धी मिळेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘काही जण त्यांचे जुने मालदीव व्हेकेशनचे फोटोसुद्धा डिलिट करत आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
Next actor to post a honeymoon photo from Madh Island is getting a National Award. Pakka.
— Vir Das (@thevirdas) January 8, 2024
वीर दासने आणखी एका ट्विटद्वारे सेलिब्रिटींवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. ‘जर यापुढे अभिनेत्याने मढ आयलँड इथल्या हनिमूनचे फोटो पोस्ट केले तर त्याला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळेल’, असं त्याने म्हटलंय. मोदींनी लक्षद्वीप बेटाच्या भेटीनंतरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर मालदीवमधील काही नेत्यांनी आक्षेपार्ह शब्दांमध्ये टिप्पण्या केल्या. त्यावर माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी टीका करून सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. दुसरीकडे भारत सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली.