काही वर्षांपूर्वी रस्त्यावरील चहाच्या टपरीवरील एक हँडसम तरुण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 2016 मध्ये अर्शद खान नावाचा हा तरुण त्याच्या दिसण्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आला होता. त्याच अर्शदचं आता संपूर्ण नशीब पालटलं आहे. त्याने ‘शार्क टँक पाकिस्तान’मध्ये आपल्या कॅफेच्या व्यवसायासाठी तगडी गुंतवणूक मिळवली आहे. या शोमध्ये अर्शदने त्याच्या ऑनलाइन लोकप्रियतेचा आणि भविष्यातील स्वप्नांचा उल्लेख केला. त्याच्यासोबत त्याचा पार्टनर कझिम हासनसुद्धा या शोमध्ये आला होता. त्याने परीक्षकांना ‘कॅफे चायवाला’ या त्यांच्या ब्रँडबद्दलची संपूर्ण माहिती दिली आणि त्यात 1 कोटी पाकिस्तानी रुपयांच्या (सुमारे 30 लाख) गुंतवणुकीची मागणी केली.
‘शार्क टँक’ या शोमध्ये काही मोठे व्यावसायिक परीक्षक म्हणून येतात आणि विविध व्यवसायांमध्ये ते पैसे गुंतवतात. यामुळे स्टार्ट अप्स, छोटे व्यवसाय यांना गुंतवणूक मिळवण्यासाठी मदत होते. या शोमध्ये अर्शदने स्वत:विषयीची माहिती दिली. “2016 मध्ये माझा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर काही महिने माझ्यासोबत नेमकं काय घडतंय हेच मला समजत नव्हतं. मी मॉडेलिंग आणि अभिनयालाही सुरुवात केली. त्याआधी मी कधीच इस्लामाबादच्या बाहेरसुद्धा गेलो नव्हतो. अनेकांनी मला माझा कॅफे सुरू करण्याचा सल्ला दिला होता. दुसऱ्यांच्या ढाब्यावर काम करताना माझं स्वत:चं कॅफे असावं, हे स्वप्न मी पाहत होतो”, असं तो सांगतो.
यावेळी अर्शदचा बिझनेस पार्टनर कझिम म्हणतो, “2020 मध्ये आम्ही आमचा पहिला कॅफे सुरू केला. तो इस्लामाबादमधील रुफटॉप कॅफे होता. पण हा कॅफे सुरू करताच कोरोना महामारी आली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात केली. आता आमचे पाकिस्तानमध्ये दोन आणि इंग्लंडमध्ये तीन आऊटलेट्स आहेत. आम्ही फ्रँचाइजी मॉडेलने काम करतोय. 35 हजार पाकिस्तान रुपयांना (10,600) आम्ही कॅफेची फ्रँचाइजी देतो आणि त्यात 5 टक्के रॉयल्टी स्वीकारतो. युकेमध्ये याच फ्रँचाइजीची फी सुमारे 150,000 आणि 200,000 पाऊंडच्या दरम्यान आहे. या प्रत्येक आऊटलेटमधून 1000 पाऊंड्सपेक्षाही (सुमारे 1 लाख रुपये) जास्त महसूल आम्ही कमावतोय. असे हजारो आऊटलेट्स आम्हाला सुरू करायचे आहेत.”
तीन वर्षांत त्यांची एकूण कमाई सुमारे 2 कोटी पाकिस्तानी रुपये असल्याचं शोमधील परीक्षक जुनैद इक्बालने नमूद केलं. परंतु हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीबद्दल अर्शदला फारशी माहिती नसल्याने त्याने गुंतवणूक करण्यास नकार दिला. दुसरे परीक्षक फैसल आफताब यांनीसुद्धा सुरुवातीला गुंतवणूक करण्यात रस दाखवला. मात्र चर्चेअखेर त्यांनीसुद्धा नकार दिला. तिसरे परीक्षक राबील वाराइच यांनी अर्शद आणि कझिम यांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली. पण महसूल कमी असल्याने आणि बिझनेसमध्ये बरंच लक्ष द्यावं लागणार असल्याने त्यांनी 24 टक्के इक्विटीची मागणी केली.
अखेर परीक्षक रोमन्ना दादाने सांगितलं की तिला परदेशात असाच व्यवसाय चालवण्याचा अनुभव आहे. तिने राबीलसोबत भागीदारी करण्याची ऑफर दिली. त्यानंतर उस्मान बशीरने 30 टक्के इक्विटीची मागणी करत राबील आणि रोमन्नासोबत भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर कझिमने सांगितलं की त्यांना दुसऱ्यांकडूनही अशीच ऑफर मिळाली आहे. पण काही अटींवर अमेरिकेसाठी ‘मास्टर फ्रँचाइजी’ खरेदी करण्यात रस आहे का, असा सवाल त्याने उस्मानला केला. अखेर बरीच चर्चा झाल्यानंतर कझिमने परीक्षकांना त्यांची इक्विटीची मागणी कमी करण्याची विनंती केली. अर्शदने या चर्चेअखेरीस राबील आणि रोमन्ना यांची ऑफर स्वीकारली.